दापोलीः- सहकारात स्वाहाकार आला, सरकारचे कायदे पाळले नाहीत गटातटाचे राजकारण सुरू झाले पक्षीय राजकारण आले म्हणजे एखादी संस्थाही लयास जाण्यास वेळ लागत नाही. गेल्या 44 वर्षात शिवकृपा पतसंस्थेने सहकाराचे हे तत्त्व काटेकोरपणे जपले आहे. म्हणूनच आज 5 लाखांहूनही अधिक सभासदांचा विश्वास हा आमच्या पतसंस्थेमागे असून त्यांच्याच विश्वासावर आम्ही आज दापोलीत 123 वी शाखा ही सुरू करत असल्याचे मत शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष गोरख चव्हाण यांनी व्यक्त केले.
संपूर्ण देशभरात दिप स्तंभाप्रमाणे काम करणाऱ्या व स्वतःच्या 122 शाखा, 13 विभागीय कार्यालये, 3 क्षेत्रीय कार्यालये, नवीमुंबई येथे संस्थेचे प्रशस्त कार्यालय असणाऱ्या शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड यांनी नुकतीच दापोली येथे आपल्या नव्या शाखेची सुरूवात केली. या शाखेचे उद्घाटन दापोलीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा घाग यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष चंद्रकांत वंजारी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप राजपुरे, माजी समाजकल्याण सभापती चारूता कामतेकर, पंचायत समिती सदस्य भाऊ इदाते, जागा मालक नजीर अरकटे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे, मिलिंद शेठ, यांच्यासह दापोली शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आपल्या मनोगतात संस्थेचे अध्यक्ष गोरख चव्हाण म्हणाले की, शिवकृपा पतसंस्थेला भगवंताचे अधिष्ठान लाभलेले आहे. त्यामुळे भगवंताचे अधिष्ठान लाभलेली गोष्ट ही कधीही अपयशी ठरत नाही. या संस्थेच्या स्थापनेबद्दल बोलताना ते म्हणाले की आम्ही साताऱ्याकडील काही मंडही नोकरी धंद्यानिमित्त मुंबई येथे आलो होतो. त्यावेळी दर आठवडयाला विक्रोळी येथील शिवमंदिरात जमत असू त्यावळी समाजाचे आपण काही तरी देणे लागतो या भावनेतून पतसंस्थेची संकल्पना पुढे आली. त्यानंतर या संस्थेला नाव कोणाचे द्यायचे याबाबत विचार झाल्यावर शिवशंभूच्या मंदिरात आपण बसून हा विषय पुढे आणला असल्याने शिवशंभुच्या नावे ही संस्था स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. व संस्थेला शिवकृपा हे नाव देण्यात आले. संस्थेची सुरूवात ही 1982 ला स्थापना झाली. सुरूवातीला संस्थेकडे 520 सभासद होते. आज 5 लाख 15 हजार सभासद संख्या असलेली ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील एकमेव पतसंस्था असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सभासदांना काटेकोरपणे कर्ज देतो व त्याचप्रमाणे त्यांच्या ठेवीही स्विकारतो मात्र कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही तितकेच कठोर असून कर्मचाऱ्याच्या मनात कोणताही वाईट विचार येऊ नये यासाठी पतसंस्थेने स्वतःचे ॲप तयार केले असून प्रत्येक कर्मचाऱ्यांला स्वतःचा फिटनेस ठेवण्यासाठी ठरावीक किलोमीटर चालावे लागते. त्याचप्रमाणे त्यांना पगारही सहकारी बँकांच्या तुलनेत जास्त देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्याचप्रमाणे अन्य सुविधा कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध केल्या असल्याने कर्मचारी या संस्थेमध्ये मोठया आनंदाने काम करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी दापोली व्यापारी असोससिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप राजपुरे म्हणाले की, दापोली तालुक्याने नेहमीच चांगल्या गोष्टीचे स्वागत केले असून दापोलीतील सर्व व्यापारी हे या पतसंस्थेला भरभरून मदत करतील पतसंस्थेनेही त्यांच्या रोजच्या गरजा लक्षात घेउन त्यांना सहकार्य करावे. दापोलीच्या नगराध्यक्षा सौ. कृपा घाग यांनी दापोलीमध्ये विविध पतसंस्था या येत असून या पतसंस्थेचे दापोली नगरीत स्वागत करताना आपल्याला विशेष आनंद होत आहे. या संस्थेने आतापर्यंत ज्याप्रमाणे दीपस्तंभासारखे काम केले आहे तेच काम यापुढेही करावे असे त्यांनी सांगितले.
यावेळी पतसंस्थेच्या वतीने दापोलीतील विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. अत्यंत भक्तीमय वातावरणात या पतसंस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.