दापोलीः-दापोली शहरातील मच्छी मार्केट परिसरात फुटपाथवर वर्षानुवर्षे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या चिकन व मटण विक्रेत्यांवर दापोली नगरपंचायतीने बुधवारी धडक कारवाई केली. सुमारे 24 व्यावसायिकांनी फुटपाथवर दुकाने थाटली होती. यामुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता.
नगरपंचायतीने संबंधित व्यावसायिकांना पाच ते सहा वेळा नोटिसा बजावून नव्याने उभारलेल्या अधिकृत चिकन-मटण व मच्छी मार्केट मध्ये स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. व्यावसायिकांच्या सुचनेनुसार नव्या इमारतीमध्ये आवश्यक अंतर्गत बदलही करण्यात आले होते. मात्र, वारंवार सूचना देऊनही स्थलांतर न झाल्याने नगरपंचायतीने अखेर कठोर कारवाईचा निर्णय घेतला. बुधवारी नगरपंचायतीचे पथक जेसीबीसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर फुटपाथवरील अनधिकृत दुकाने जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे मच्छी मार्केट परिसरातील फुटपाथ मोकळा झाला आहे.
यावेळी दापोली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महेश धुमाळ, प्रशासकीय अधिकारी सारंग कुलकर्णी, अभियंता सुनील सावके, दापोली नगरपंचायतीचे अधिकारी आणि कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते.