चिपळूण :  चिपळूण पंचायत समिती निवडणूकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या झालेल्या बैठकीत गटनेतेपदी सूर्यकांत खेतले यांची निवड करण्यात आली. सत्ता कोणासोबत स्थापन करायची यावर निर्णय बैठकीत झाला नाही. परिणामी सत्ता स्थापनेचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

पंचायत समितीसाठी मतदारांनी त्रिशंकू कौल दिल्याने सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल जाहीर होताच आमदार शेखर निकम यांनी ठाकरे सेनेसोबत सत्ता स्थापनेचे संकेत दिले होते. सभापतीपदासाठी जे पाठिंबा देतील त्यांच्या सोबत सत्ता स्थापनेचा दावा निकम यांनी केला होता. पंचायत समितीच्या १८ जागांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाला सर्वाधिक ७, शिवसेनेला ४, भाजपला ३ आणि ठाकरे सेनेला ४ जागा मिळाल्या आहेत. सत्ता स्थापनेसाठी १० सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. येत्या काही दिवसात सभापती निवडीचा कार्यक्रम घोषीत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पाग हायस्कूल येथे बैठक घेतली. या बैठकीत पंचायत समितीसाठी गटनेतेपदी सूर्यकांत खेतले यांची निवड करण्यात आली. खेतले यांनी यापूर्वी उपसभापती म्हणून काम केले आहे. पक्षाचे ते ज्येष्ठ पदाधिकारी असून त्यांचा सातत्याने सामाजिक क्षेत्रात वावर राहिला आहे. त्यामुळे खेतले यांना एकमताने गटनेतेपदी संधी देण्यात आली. पंचायत समितीवर सत्ता कोणासोबत स्थापन करायची, याचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही. या बैठकीत देखील गटनेता वगळता चर्चा झाली नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्यावर निर्णय घेऊ असे बैठकीत सांगण्यात आले. सुरवातीला राष्ट्रवादीकडून ठाकरे सेनेसोबत सत्ता स्थापनेचा कल होता. मात्र जिल्ह्यात ठाकरेसेनेला उभारी मिळू नये, यासाठी गुप्त हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आमदार शेखर निकम कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेले आहे.

बैठकीला आमदार शेखर निकम, शौकतभाई मुकादम, जयंद्रथ खताते, दादा साळवी, रमेश राणे, अशोक कदम, पांडुरंग माळी, नितीन ठसाळे, दिशा दाभोळकर, नवनिर्वाचीत सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण, संजय कदम, मेघा इंगावले, स्नेहा साळवी, मनस्वी बैकर, यांच्यासह मयूर खेतले, स्वप्नील शिंदे, दिनेश शिंदे आदी उपस्थित होते.