मुंबई : MMRDAच्या २३५ पदांच्या भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता, Normalisation पद्धतीबाबत निर्माण झालेल्या गंभीर शंका आणि उमेदवारांच्या तक्रारींबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने गेल्या सहा दिवसांपासून सातत्याने आवाज उठवला. काँग्रेसच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत MMRDAने अखेर माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली IIT Bombayचे प्रा. श्यामप्रसाद करगडे आणि प्रा. दासका सत्यनारायण मूर्ती यांची तीन सदस्यीय उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. समितीचा अहवाल प्राप्त होईपर्यंत भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाही स्थगित ठेवण्याचा निर्णयही MMRDAने घेतला आहे.
या निर्णयाचे काँग्रेस स्वागत करते. मात्र, समितीने केवळ प्राप्त तक्रारींची पडताळणी न करता संपूर्ण परीक्षा प्रक्रियेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि तांत्रिक तपासणी करणे आवश्यक आहे.
याबाबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. धनंजय रामकृष्ण शिंदे म्हणाले,
“गेल्या सहा दिवसांपासून काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी हा प्रश्न सातत्याने लावून धरला. MMRDAने उच्चस्तरीय समिती नियुक्त करून भरती प्रक्रियेतील पुढील कार्यवाही थांबवण्याचा निर्णय घेतला, ही आमच्या मागणीची दखल आहे. मात्र, आमचा लढा केवळ समिती नियुक्त करण्यापुरता मर्यादित नाही. संपूर्ण सत्य समोर येईपर्यंत हा लढा सुरूच राहील. समितीने केवळ उमेदवारांच्या तक्रारींची पडताळणी न करता संपूर्ण परीक्षा प्रक्रिया, Normalisation पद्धती, Raw Score आणि Normalised Score मधील फरक, CCTV फुटेज, डिजिटल लॉग्स तसेच TCSच्या भूमिकेची स्वतंत्र आणि तांत्रिक तपासणी करावी. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; मात्र गैरप्रकार करणाऱ्यांची शिक्षा प्रामाणिकपणे परीक्षा देऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना होता कामा नये. दोषींना संरक्षण नाही आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय नाही, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे.”