खेड : आपले मूळ गांव वडगांव व सध्या राहत असलेल्या भरणे येथील घरांची समाजकंटकांनी तोडफोड करून आपणांस नामोहरम केले आहे , तसेच एस. टी. कर्मचारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणांस मारहाण केली आहे. या दोन्ही घटनांमधील संशयित आरोपींची नावे देऊनही अद्यापही पोलीस प्रशासन व एस. टी. प्रशासन यांनी कोणतीही कारवाई न करता या संशयितांना पाठिशी घातल्याचा आरोप तालुक्यातील मूळ वडगांव व सध्या भरणे येथे राहत असलेले सेवानिवृत्त एस.टी. कर्मचारी चंद्रकांत लक्ष्मण मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आज गांधी जयंतीदिनी येथील तहसिल कार्यालयासमोर श्री. मोरे उपोषणास बसणार आहेत.
तक्रारदार चंद्रकांत लक्ष्मण मोरे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात वर्षभरात खेड पोलीस स्थानकात सन २०२६ मध्ये २७ फेब्रुवारी, २ मार्च, १३ मार्च, १६ मार्च, २० मार्च२३ मार्च, २४ मार्च, १ मे, ११ मे, १९ मे, २३ मे अशा अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहेत तसेच एसटी कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याबद्दल एस.टी. प्रशासनाकडे तक्रारी दाखल आहेत, मात्र पोलीस व एस. टी. प्रशासन या दोघांनीही याची साधी दखलही घेतली नाही. ते सध्या राहत असलेल्या भरणे येथील घराची दि. २३ मे २०२६ रोजी खेड आगारातील एस. टी. चालक शिवाजी केंद्रे, त्यांचा मुलगा व अन्य यांनी तोडफोड करून नुकसान केले आहे याचीही तक्रार दिलेली आहे. तसेच दि. २४ जुलै २०२६ च्या तक्रारीत संशयित आरोपींची नावेही नमूद केलेली आहेत. मात्र काहीही कारवाई झाली नस‌ल्याने श्री मोरे हे दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी यशस्कीसहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले होते, मात्र आम्ही तुम्हांला योग्य न्याय देऊ असे सांगून त्यांना उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण मागे घ्यायला लावले, मात्र अद्यापपर्यंत त्यांना आश्र्वासित केल्याप्रमाणे कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. घराची तोडफोड करण्यात आल्याने घराचा पंचनामा करून संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई होणे अपेक्षित होते , मात्र श्री.मोरे यांना पोलीस व एस. टी. प्रशासन या दोहोंकडूनही कोणताही न्याय मिळत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.