खेड : – तालुक्यातील खोपी येथील अरविंद राजाराम सुतार (वय ५५) यांचा रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना ९ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे २.३९ वाजता घडली.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद सुतार यांना ८ ऑगस्ट रोजी पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने खोपी येथील डॉ. मोरे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांना रिक्षाने कळंबणी बुद्रुक येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.कळंबणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांना आयसीयू विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच ९ ऑगस्ट रोजी पहाटे २.३९ वाजता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ८३/२०२६ अंतर्गत बीएनएसएस कलम १९४ नुसार करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके कारण तपासाच्या प्रक्रियेत स्पष्ट होणार असून, या आकस्मिक मृत्यू प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.