चिपळूण : ५ ऑक्टोबर १७३३ रोजी झालेल्या गोवळकोटच्या ऐतिहासिक रणसंग्रामाच्या स्मरणार्थ इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे शनिवार दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता विशेष लढाई स्मरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गोवळकोटच्या ऐतिहासिक भूमीत घडलेल्या या रणसंग्रामातील शौर्य, पराक्रम आणि बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘गोवळकोटचा रणसंग्राम – , ५ ऑक्टोबर १७३३ ची रक्तरंजीत पहाट’ हा विशेष ऐतिहासिक नाट्यप्रयोग आहे. राधेकृष्णा एन्टरटेन्मेंट, सांखवाळ-गोवा प्रस्तुत महिला नाट्यकर्मी यांच्यावतीने हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. गोवळकोटच्या रणभूमीवरील ऐतिहासिक प्रसंग, वीरांचा पराक्रम, संघर्ष आणि स्वराज्यासाठी केलेला त्याग नाट्यरूपातून साकारण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महान पराक्रमी सरनौबत आनंदराव गोळे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात येणार आहे. गोवळकोटच्या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे तसेच या रणसंग्रामाची शौर्यगाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
इतिहासप्रेमी, दुर्गप्रेमी, युवा वर्ग आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लढाई स्मरण दिन तसेच ‘गोवळकोटचा रणसंग्राम –५ ऑक्टोबर १७३३ ची रक्तरंजीत पहाट’ या विशेष नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरवीर पिलाजीराव गोळे प्रतिष्ठान आणि राजे सामाजिक प्रतिष्ठान, गोवळकोट यांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण
दिनांक : ३ ऑक्टोबर २०२६
वेळ : सायंकाळी ६ वाजता