मंडणगड : मंडणगड तालुक्यात पावसातील खंडामुळे खरीप हंगामातील भात, नाचणीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेती पिकांचे संयुक्त पंचनामे तातडीने करण्याचे आदेश तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, मंडणगड यांच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. हा आदेश . २९ सप्टेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.
मंडणगड तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये शेती पिकांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवालातून निदर्शनास आले आहे. त्यानुसार ग्रामस्तरीय अधिकारी व संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकांमार्फत नुकसानग्रस्त शेतीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत.
पंचनाम्यावेळी ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतजमिनीचे सर्वे क्रमांक/गट क्रमांक दाखवून सातबारा उताऱ्यातील नोंद व प्रत्यक्ष क्षेत्राची पडताळणी करणे, तर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मोबाईल ॲपच्या माध्यमातून जीपीएस सक्षम छायाचित्रे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या छायाचित्रांमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित असणे अपेक्षित आहे. सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष शेती व पिकांची पाहणी करून नुकसानीची टक्केवारी निश्चित करण्यात येणार आहे. पंचनाम्यासोबत शेतकऱ्यांचे आधारकार्ड, सातबारा उताऱ्याची प्रत, बँक पासबुकची प्रत, विहित नमुन्यातील हमीपत्र/संमतीपत्र आणि संपर्क क्रमांक घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे व संबंधित कागदपत्रे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या संयुक्त स्वाक्षरीने पर्यवेक्षण अधिकाऱ्यांकडे सादर करावयाची आहेत.
पर्यवेक्षण अधिकाऱ्यांनी पंचनाम्यांची शासन निकषांनुसार तपासणी करून ते तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत. त्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी महसूल मंडळनिहाय एकत्रित अहवाल तालुकास्तरीय समितीकडे सादर करण्याचे निर्देश आहेत.
पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तातडीने व वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कामात हलगर्जीपणा झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५२ अन्वये कारवाई करण्यात येईल. तसेच चुकीचे पंचनामे आढळल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अन्वये कारवाई करण्याचा इशाराही आदेशात देण्यात आला आहे.
पावसाच्या खंडामुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या पंचनाम्यांमुळे त्यांच्या नुकसानीची अधिकृत नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आदेशानुसार मंडणगड तालुक्यातील संबंधित यंत्रणांचे संयुक्त पथकाने पंचनाम्याचे काम तातडीने हाती घेतेले आहे. व मंडळ ग्राम व प्रत्यक्ष शेतकरी पोहचत आहे.