वालोपे : वालोपे ग्रामपंचायत कार्यालयात परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने सर्वरोग निदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, एकूण ४९ रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये मेडिसिन विभागाचे डॉ. सुरज शिरसाट, सर्जरी विभागाच्या डॉ. नेहा मयेकर, ऑप्थल्मॉलॉजी विभागाच्या डॉ. श्रद्धा राठोड तसेच गायनॅकॉलॉजी विभागाच्या डॉ. देविका मॅडम यांनी रुग्णांची तपासणी केली.
यावेळी रुग्णांची विविध आजारांसाठी तपासणी करून आवश्यकतेनुसार सीबीसी (CBC) व रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली. तसेच महिलांसाठी स्तन कर्करोगाच्या अनुषंगाने ब्रेस्ट एक्झामिनेशन करण्यात आले. तपासणीनंतर रुग्णांना त्यांच्या आजारानुसार आवश्यक औषधोपचार देण्यात आले तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच विविध वैद्यकीय तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणीची सुविधा मिळाल्याने ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
