लांजा : लांजा तालुक्यात ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढत असून, दुपारच्या वेळेत जाणवणाऱ्या कडक उन्हाचा लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत, लांजा तालुक्यातील शाळा सध्याची उष्णतेची तीव्रता कमी होईपर्यंत सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पक्षाचे लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती, लांजा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
सध्या वाढलेल्या तापमानामुळे शाळेत ये-जा करणाऱ्या तसेच दुपारच्या सत्रात शाळेत उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. तीव्र उन्हामुळे डिहायड्रेशन, चक्कर येणे, अशक्तपणा आणि उष्माघात यांसारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
केवळ शैक्षणिक वेळापत्रकापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता महत्त्वाची! या भूमिकेतून सध्याची हवामान परिस्थिती निवळेपर्यंत शाळांच्या वेळेत बदल करून त्या सकाळच्या सत्रात भरविण्याबाबत संबंधित शाळांना तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. पालक आणि ग्रामस्थांच्या भावनांचाही विचार करून प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या वेळी शिवसेनेचे लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे, शहर प्रमुख मोहन तोडकरी, विभाग प्रमुख विश्वास मांडवकर, उपशहरप्रमुख बाबू गुरव, उपविभाग प्रमुख अल्लादिन नेवरेकर, राजेंद्र सुर्वे, शांताराम गुरव, महेंद्र पाल्ये, शिवसैनिक बेर्डे सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची वेळ येण्यापूर्वीच प्रशासनाने खबरदारी घ्यावी आणि वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळांच्या वेळांबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनाची प्रत जिल्हा परिषद रत्नागिरीचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आणि पंचायत समिती, लांजा येथील गटविकास अधिकारी यांनाही माहितीसाठी व आवश्यक कार्यवाहीसाठी देण्यात आली आहे.
