चिपळूण : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गायनकलेला व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने स्वरांश ऑडिओलाईन प्रस्तुत गायक व पत्रकार देवेंद्र जाबरे आयोजित जिल्हास्तरीय ऑनलाइन गीतगायन स्पर्धेचा निकाल, बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या स्पर्धेला विविध शाळांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला ओंकार संगीत साधनाचे केंद्रसंचालक श्री. सतीश कुंटे, प्रसिद्ध शाहीर श्री. शाहीद खेरटकर, कवी साहित्यिक श्री. राष्ट्रपाल सावंत, कुणबी सेना तालुकाप्रमुख श्री. संजय जाबरे, कुणबी सेना उपतालुकाप्रमुख श्री. राजेंद्र पवार, वादक, संगीतकार श्री. अरविंद जोगळेकर, गीतकार भाई कुळे, ह.भ.प. राकेश मोरे, परिक्षक व गीतकार आकाश निर्मळ, ह.भ.प. संकेत रामाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
पारितोषिक वितरण सोहोळ्यात स्पर्धेतील प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या 25 विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या स्पर्धेत जिल्हाभरातील 240 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ओंकार संगीत साधना केंद्राचे संचालक श्री. सतीश कुंटे यांनी स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून संगीत साधनेमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि कलागुण विकसित होतात, असे मनोगत व्यक्त केले. प्रसिद्ध शाहीर श्री. शाहीद खेरटकर यांनी लोककला आणि संगीताचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी आपल्या कलेतून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपावी, असे आवाहन केले. कवी-साहित्यिक श्री. राष्ट्रपाल सावंत यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. अशा स्पर्धांमुळे नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत सती हायस्कूल, युनायटेड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्वाधिक सहभाग नोंदवून विशेष प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेने घेतलेल्या पुढाकाराचे श्री. जाबरे यांनी प्रास्ताविकात कौतुक केले. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले. ग्रामीण आणि शहरी भागांतील विद्यार्थ्यांना समान संधी देऊन नवोदित गायकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. स्पर्धेत क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसह सहभागी झालेला प्रत्येक विद्यार्थी आयोजकांच्या दृष्टीने विजेता असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी गायनाचा सराव सुरू ठेवावा आणि मेहनतीच्या जोरावर आपली कला अधिक समृद्ध करावी, असे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. सोनाली खर्चे यांनी मानले.
प्रथम 25 क्रमांकाचे मानकरी
स्वराज जीवन पाटील, दुर्वांक गणेश खेराडे, ओवी दिपक भोसले, मैत्रेयी पंकज डाकवे, श्रीनिधी शेखर मेस्त्री, अर्णव विकास साळवी, अपूर्वा अरविंद चव्हाण, भार्गवी शंकर कानडे, त्रिग्य गायकवाड, मुक्ता संजय बापट, आस्था वैभव कानडे, सार्थक अंकुश जंगम, आदित्य महेंद्र कुळे, आस्था संजय मद्रे, पूर्वा संतोष जंगम, स्वरा संदीप घाग, श्रावणी अनिल मेंगे, सान्वी अनिल रेवाळे, स्वरा सुशांत पवार, लक्षण्या तांदळे, स्वरा तुषार मोहिते, वैष्णवी अजित वाडकर, गार्गी मिथुन देसाई, गौरी भगवान जांभळे, भार्गवी चिन्मय काळेविजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम
जिल्हास्तरीय गीतगायन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहोळा उत्साहात ; गायक, पत्रकार देवेंद्र जाबरे यांच्यावतीने आयोजन; 240 विद्यार्थ्यांचा सहभाग
