खेड : तालुक्यातील सुकिवली जिल्हा परिषद गटात दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करून भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी ‘मिशन बंधारे’ अंतर्गत ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ मोहिमेला गती देण्यात आली आहे. पुरे, कळंबणी खुर्द आणि विहाळी परिसरात ग्रामपंचायती व ग्रामस्थांच्या सहभागातून जलसंधारणाच्या कामांवर भर दिला जात आहे.
पावसाळ्यात डोंगराळ भागातून आणि ओढ्यांमधून वाहून जाणारे पाणी बंधाऱ्यांच्या माध्यमातून अडवून जमिनीत मुरविणे, भूजलपातळी वाढविणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमामुळे पाण्याचे स्थानिक पातळीवर नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यास मदत होणार आहे. जलसंधारणाची कामे यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायतींचा पुढाकार आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरत आहे. लोकसहभागातून बंधारे उभारून पावसाच्या पाण्याचा अधिकाधिक उपयोग करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, पंचायत समिती सदस्य महेंद्र भोसले, महेश मोरे, ग्रामीण संपर्कप्रमुख अनिल भोसले, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, आंबवली ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय यादव यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवासैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.