खोपोली : शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आमदार श्री. महेंद्र सदाशिव थोरवे आणि खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. कुलदीपक रामदास शेंडे यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने वरची खोपोली येथील मत्स्यबीज केंद्राच्या साठवण तलावाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
भविष्यात खोपोलीकरांना मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा, यासाठी अतिरिक्त जलसाठा निर्माण करण्याच्या शक्यतांचा या पाहणीदरम्यान आढावा घेण्यात आला. उपलब्ध जागा आणि विद्यमान साठवण तलावाचा उपयोग करून प्रस्तावित प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीच्या दृष्टीने आवश्यक बाबींवर चर्चा करण्यात आली.
या वेळी राज्याचे रोजगार हमी, खारभूमी व फलोत्पादन मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले, आमदार श्री. महेंद्र थोरवे यांच्यासह विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.
खोपोली शहराच्या वाढत्या पाण्याच्या गरजा लक्षात घेता भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी अतिरिक्त जलसाठा निर्माण करण्याच्या पर्यायांचा विचार केला जात असून, शहराला दीर्घकालीन आणि शाश्वत पाणीपुरवठा मिळावा, या उद्देशाने हा पाठपुरावा सुरू आहे.
खोपोलीकरांना भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये आणि शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम व्हावा, यासाठी आमदार महेंद्र थोरवे आणि नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांच्या पुढाकारातून प्रयत्न सुरू आहेत.
