मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यामध्ये लोकसभा प्रभारी, जिल्हा प्रभारी व विधानसभा प्रभारी पदी विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हे सर्व प्रभारी व जिल्हाध्यक्ष यांची विभागवार बैठक घेण्यात येणार आहे. कोकण विभागाची बैठक बुधवार, दिनांक ४ नोव्हेंबर, २०२६ रोजी टिळक भवन, दादर, मुंबई येथे तर उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक गुरूवार, दिनांक ५ नोव्हेंबर, २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे. इतर विभागांच्या बैठकांची तारीख लवकरच निश्चित केली जाणार आहे.

या पदाधिकाऱ्यांकडून असलेल्या कामाच्या अपेक्षा (SOP) प्रत्येक पदाधिकाऱ्याकडे लवकरच पाठविण्यात येणार आहेत. सर्व प्रभारींच्या कामाचा आढावा तीन महिन्यात घेण्यात येईल व त्यांनी केलेल्या कामाची समिक्षा करून प्रभारींच्या यादीमध्ये त्यानुसार फेरबदल करण्यात येणार आहेत. काँग्रेस पक्षाचे संघटन राज्यात अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नियोजनबद्ध कामाची आखणी केली असून काँग्रेसला पुन्हा सोनियाचे दिवस आणण्याचा संकल्प केलेला आहे, अशी माहिती प्रदेश काँग्रेसने दिली आहे.