मुंबई : देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी केटरिंग सेवा सुरू केली आहे, असा टोला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच देशाचे गृहमंत्री आणि पंतप्रधान संसदेच्या सभागृहात येत नाहीत ही खेदजनक नव्हे तर लाजिरवाणी बाब आहे असा घाणाघातही संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अप्रत्यक्षपणे न्यायव्यवस्थेवर म्हणजेच सुप्रीम कोर्टावर खासदार किंवा पक्षफुटीसंदर्भात जो खटला सुरू आहे, त्याबाबत सुप्रीम कोर्टावर अप्रत्यक्ष दबाव आणत आहेत. या विषयी उद्धव ठाकरे यांनी ठाम भूमिका मांडली. पक्ष आणि चिन्हाबाबात चार वर्ष प्रलंबित असलेल्या खटल्याची सुनावणी आता सुरू झाली. ठाण्याचे जे हे टिकोजीराव आहेत, विधीमंडळातील आमदार सोडून गेले म्हणून त्यांना निवडणूक आयोगाने परस्पर पक्ष दिला आहे. आता विधीमंडळातला पक्ष वेगळा आहे आणि मूळ पक्ष वेगळा आहे. मूळ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे असून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेकडे हा पक्ष सोपवलेला आहे. आणि आम्ही सगळे मूळ पक्षासोबत काम करत आहोत. विधीमंडळातले 5-10 आमदार फुटले म्हणून पक्षाची मालकी एखाद्या ऐऱ्या गैऱ्याकडे कशी काय जाऊ शकते? देशाच्या पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानी केटरिंग सेवा सुरू केली आहे. गद्दारांनी यावं आणि खाऊन जावं. तुम्हाला जेवणावळी खायला घालायला वेळी आहे. पण संसदेत तुम्ही यावे अशी मागणी करून 16 दिवस झाले, तिथे तुम्ही येऊ शकत नाहीत? या देशाची लोकशाही आणि संविधानांची विटंबना गेल्या 75 वर्षात झाली नसेल, इतकी या काळात झाली आहे असेही संजय राऊत म्हणाले.

सहा खासदारांना ढोकळा, जिलेबी फाफडा खायला घातली अशी माहिती त्या खासदारांनी दिली. त्यातल्या एका खासदाराला म्हणजे मोदी जिलबी भरवत होते. हे काय पंतप्रधानांचे काम आहे का? ज्यांच्यावर अपात्रतेचा खटला सुरू आहे त्यांना जेवायला बोलवत आहात. मी यांच्या पाठीशी आहे असे चित्र तयार करत तुम्ही न्यायालयावर दबाव टाकत आहात. पण संविधान नरेंद्र मोदींपेक्षा मोठे आहे. आणि सुप्रीम कोर्टसुद्धा मोदींपेक्षा मोठे आहे. आम्हाला खात्री आहे ते निष्पक्ष न्याय देतील. आम्हाला संविधानानुसार न्याय पाहिजे हे उद्धव ठाकरे यांचे विधान अगदी बरोबर आहे. आम्हाला मेहेरबानी नकोय किंवा आम्हाला न्याय विकत नकोय, असे संजय राऊत म्हणाले.