खेड : पाणी अडवा, पाणी जिरवा, हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या वतीने खेड तालुक्यातील किंजळे तर्फे नातू, नांदीवली आणि चाटव या तीन गावांत बंधारा बांधण्याचा उपक्रम राबविण्यात आला. रविवार, २६ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांच्या सहकार्याने ‘मिशन बंधारा २०२६’ अंतर्गत हा उपक्रम पार पडला.
पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढविणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. दिवसेंदिवस पाण्याचे महत्त्व वाढत असताना जलसंवर्धनाच्या कामातून पाण्याची बचत आणि भूजल पुनर्भरणाला चालना देण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. या उपक्रमात कोकण खेड युवाशक्तीचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव नंदकुमार महाडिक, खजिनदार अरुण यादव, सामाजिक कार्यकर्ते व मार्गदर्शक सुनील मामा शिंदे, मधुकर कदम, संदीप सकपाळ सर, विकास महाडिक यांच्यासह तिन्ही गावांतील ग्रामस्थ आणि मान्यवर सहभागी झाले होते.
जलसंवर्धनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा
पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी केवळ शासनाच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता ग्रामस्थांनीही जलसंधारणाच्या कामात सहभागी होणे आवश्यक आहे. बंधाऱ्यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी अडविण्यास मदत होऊन भूजल पातळी वाढविण्यास हातभार लागू शकतो. या उपक्रमातून जलसंवर्धनाबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्था सामाजिक विकासासोबतच जलसंवर्धनाच्या क्षेत्रातही कार्यरत असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा आणि भविष्य सुरक्षित करा’ हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
खेड तालुक्यात तीन गावांत बंधाऱ्यांची उभारणी…!
