चिपळूण -कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटातील खड्डे भरण्यासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या चिपळूण कार्यालयात धडक देऊन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या निवेदनात म्हटले आहे की, कुंभार्ली घाटातील वळणावरच मोठ मोठे खड्डे पडले आहेत. छोटी चार चाकी गाडी या खड्ड्यातून बाहेर पडणे अशक्य आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांनी रस्ता भरला गेला आहे,मात्र पाऊस गेल्या नंतरही या खड्ड्याकडे महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. तरी हे खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
मनसेचे वाहतूक जिल्हाधक्ष राजू खेतले यांच्या नेतृत्वाखाली ॲड.वृषाली सावंत,माजी शहराध्यक्ष राजेंद्र गोंजारी,विनोद चिपळूणकर,ज्ञानेश्वर पवार,अल्ताफ शेख,मस्तकिन शहा,मनोज साळुंखे,संतोष मठपती,कासिम सय्यद, नईम शहा, चांद शहा,,गणेश खेडेकर,उमेश पवार आदी मनसैनिक यावेळी उपस्थित होते.
यावेळी राजू खेतले म्हणाले की, कुंभार्ली घाटाचे काम सुरू करण्यात आले आहे.मात्र ठेकेदाराला कोणत्या कामाला प्राधान्य द्यावे हे सांगण्याची जबाबदारी आपली नाही का?असा सवाल त्यांनी केला.त्यावर उपअभियंता यांनी आम्ही खड्डे भरायला सांगतो असे स्पष्ट केले.
आज हजारो वाहने घाटातून ये-जा करीत आहेत. शेकडो रुग्ण उपचारासाठी जात आहेत.अत्यवस्थ रुग्ण घेऊन जाताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहेत. अनेक छोट्या गाड्या खड्ड्यात अडकून बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. एवढे सर्व असताना अधिकारी गप्प का?असा सवाल राजू खेतले यांनी केला .
