रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने डिजिटल बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवत मागील आर्थिक वर्षात ग्राहकांकडून तब्बल १,०१५ कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार पूर्ण केले आहेत. ग्रामीण आणि दुर्गम भागातील ग्राहकांना आधुनिक व सुरक्षित बँकिंग सेवांशी जोडण्याच्या बँकेच्या धोरणामुळे हे यश संपादन करणे शक्य झाले आहे. विशेषतः यूपीआय (UPI) प्रणालीद्वारे ७९१ कोटी रुपयांचे व्यवहार झाले असून, बँकेच्या ग्राहकांचा डिजिटल व्यवहारांकडे वाढलेला कल यावरून स्पष्ट होत आहे.
ग्राहकांना कोणत्याही वेळी आणि कुठूनही सहज व्यवहार करता यावेत, या उद्देशाने बँकेने एटीएम, मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड (QR Code) आणि साऊंड बॉक्स यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. जिल्ह्याच्या दुर्गम भागांतील शाखांच्या माध्यमातून डिजिटल साक्षरता मोहिमा, ग्राहक मेळावे आणि फिरत्या एटीएम व्हॅनद्वारे बँकेने जनजागृती केली. या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांचा डिजिटल बँकिंगवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. व्यवहारांची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी बँकेने एसएमएस अलर्ट सेवा तसेच चोवीस तास सायबर सुरक्षिततेसाठी विशेष देखरेख यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, म्हणजे १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीत, बँकेतून मोबाईल बँकिंगद्वारे ३.०४ कोटी, यूपीआयद्वारे २६८.१० कोटी, क्यूआर कोडद्वारे ८.२९ कोटी, आयएमपीएस (IMPS) द्वारे १७.३२ कोटी आणि एटीएमद्वारे ३४.०९ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
