चिपळूण : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी, यासाठी चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे ‘डिझास्टर क्विक रिस्पॉन्स टीम’ स्थापन करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात या टीमची घोषणा करण्यात आली असून, याबाबतची माहिती प्रांत कार्यालय तसेच चिपळूण नगरपालिकेला देण्यात आली आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूरस्थिती, मोठे अपघात किंवा अन्य कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास ही डॉक्टरांची टीम तातडीने कार्यरत होणार आहे. तसेच अशा प्रसंगी सरकारी यंत्रणेला आवश्यक ते सहकार्यही या टीमकडून करण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या चिपळूण जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे. आपत्तीच्या काळात नागरिकांना त्वरित आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
