मुंबई- राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसानं धुमाकूळ घातला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस कोसकळत असल्यामुळं शेती पिकांचं विशेषत: फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सातारा जिल्ह्यात आज अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दुपारनंतर अचानक बदललेल्या हवामानामुळे जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट अनुभवायला मिळाला. वाई तालुक्यातील भुईंज, जोशीविहीर परिसरात पावसाच्या तुफान बॅटिंगमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली, तर अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्याच्या घटना घडल्या. जावळी आणि महाबळेश्वर तालुक्यातही अवकाळी पावसाने शेती क्षेत्राला फटका बसला आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर जळगावमध्येही जोरदार पाऊस झाला आहे.