मुंबई- राज्यातील सर्वसामान्यांची प्रतीक्षा अखेर संपली असून मान्सूनने आज शनिवारी तळकोकणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. हवामान विभागाने मान्सूनच्या वाटचालीची माहिती दिली असून राज्यातील मुंबईसह उर्वरित भागातही लवकरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे राज्यातील नागरिकांना लवकरच उष्णतेपासून दिलासा मिळेल. काहीभागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून या दरम्यान सोसाट्याचा वाराही वाहण्याची शक्यता आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान स्थिती अनुकूल आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागाने केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्राचा आणखी काही भाग व्यापून टाकणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. मुंबईसह कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याचे संकेत पुढच्या 48 तासांत देण्यात आले आहेत. मान्सूनच्या प्रवासासाठी स्थिती अनुकूल आहे. या सगळ्या गोष्टी सकारात्मक असल्या तरीसुद्धा मान्सूनवर अल निनोचं सावट आहे. विदर्भात मात्र अजूनही तापमान 44 डिग्रीवर आहे. घामाच्या धारा आणि उकाड्याने हैराण व्हायला होत आहे. विदर्भात मात्र मान्सूनची प्रतीक्षा आहे.