लांजा : (गोविंद चव्हाण) नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मुंबई-गोवा महामार्गालगत महावितरणच्या ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या विद्युत पोल उभारणीच्या कामामुळे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणेत अडचणी निर्माण झाल्या असून शहरातील नागरिकांना पाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

याच पार्श्वभूमीवर लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर आणि पाणीपुरवठा सभापती रफिक नेवरेकर यांनी गुरुवारी महावितरणचे अधिकारी व ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धारेवर धरत तीव्र नाराजी व्यक्त केली.

लांजा शहरातील महामार्गालगत महावितरणच्या ठेकेदारामार्फत विद्युत पोल उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या घरगुती नळजोडणीच्या लाईन्स वारंवार फुटत आहेत. तसेच अनेक ठिकाणी गळतीच्या घटनाही घडत आहेत. या गळती दुरुस्त करण्यासाठी तब्बल आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागत असल्याचे नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून प्रसंगी नागरिकांच्या रोषाला नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना तोंड द्यावे लागते. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची गरज अधिक असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.