मंडणगड : विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची सवय लावून घेणे आवश्यक असून यामध्ये ग्रंथालयाची भूमिका महत्वाची आहे. वाचनामुळे चांगले संस्कार व आपल्या विचारांना चालना मिळते. आजच्या मोबाईल, इंटरनेट आणि सोषल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचन कमी हात चालले आहे, विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे या उदेदशाने हा “वाचन प्रेरणा दिवस” आपण साजरा करीत आहोत. डॉ. कलाम यांनी बहुतांश पुस्तके विद्यार्थी व शिक्षकांसाठी लिहिली आहेत. प्रगत भारताचे डॉ. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी विविध विषयांचे वाचन करुन सुसंस्कारीत होणे गरजेचे आहे.’ असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी केले, ते सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, मराठी विभाग, सांस्कृतिक विभाग व ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. सदर कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. रविंद्रकुमार मिश्रा, संचालक श्री. आदेश मर्चंडे, श्री. संतोष चव्हाण, श्री. वैभव कोकाटे, उपप्राचार्य डॉ.विष्णु जायभाये, मराठी विभागाचे प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. संगीता घाडगे, डॉ. अशोक साळुंखे, प्रा. सुरज बुलाखे, प्रा. महादेव वाघ, पालक सौ. निलिमा गमरे, श्री. जावेद पटेल, श्री. विवेक हातकामकर, सौ. राजश्री जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नेहमी ज्ञान आणि विचारासह जगण्याची, वागण्याची, कृती करण्याची प्रेरणा ही पुस्तकांमुळे मिळू शकते. म्हणून वाचन संस्कृती टिकवायची व वाढीस लावायची असेल तर विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचे महत्व पटवून देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक श्री. वैभव कोकाटे व पालक श्री. शहानवाज सावरटकर यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. संगीता घाडगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी तसेच वाचनाची आवड वृध्दींगत व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले. तर श्री. आदेश मर्चंडे यांनी आपल्याला अध्यायवत ज्ञान आत्मसात करावयाचे असेल तर विद्यार्थ्यांनी रोज वाचन करणे आवश्यक असल्याचे सांगत ‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता, डॉ. संगीता घाडगे, प्रा. महादेव वाघ, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. महादेव वाघ यांनी मानले.