मुंबई : डोंगराळे येथील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याच्या निकालाचे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा किशोर वाघ यांनी स्वागत केले आहे. हा निकाल मानवतेला काळिमा फासणाऱ्या कृत्याला मिळालेला कठोर न्याय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

या निकालामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण होईल, असे वाघ यांनी म्हटले आहे. जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून प्रभावी युक्तिवाद आणि ठोस पुराव्यांच्या आधारे न्यायव्यवस्थेने समाजाचा विश्वास अधिक दृढ केल्याचेही त्यांनी नमूद केले.

या चिमुकलीवर झालेला अत्याचार संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणारा होता, असे सांगत वाघ यांनी या प्रकरणातील पीडित कुटुंबाप्रती सहवेदना व्यक्त केल्या.

या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याबाबत आणि आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी भक्कम पुरावे सादर करण्याबाबत निर्देश दिले होते, असे वाघ यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या मते, या भूमिकेमुळे तपासाला गती मिळाली आणि अखेर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

पीडित कुटुंबाचे दुःख कधीही भरून न निघणारे असले, तरी या कठोर शिक्षेमुळे कुटुंबाला काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी भावना वाघ यांनी व्यक्त केली. अशा गुन्हेगारांना समाजात स्थान नसल्याचे या निकालाने स्पष्ट झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.