सावर्डे : सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय १४ वर्षांखालील शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२६ चे आयोजन २९ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते गुरुवार, २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील आठ विभागांमधून २८० हून अधिक खेळाडू आणि संघव्यवस्थापक सहभागी होणार आहेत. या स्पर्धेदरम्यान महाराष्ट्र राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
ही स्पर्धा गोविंदरावजी निकम क्रीडा नगरी, सह्याद्रि कृषी विभाग, खरवते-दहिवली, सावर्डे येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील विविध विभागांतील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे.
या स्पर्धेला क्रीडाप्रेमी, पालक आणि नागरिकांनी उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढवावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
