अलिबाग : मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक हालचाली कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मैदानी खेळांकडे वळविण्यासाठी दर शनिवारी देशभक्तीपर गीतांवर आधारित कवायतींचा ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांचा मोबाईल स्क्रीन टाइम नियंत्रित करण्यासाठी मोबाईलवर गृहपाठ देणे पूर्णपणे बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी (दि.९) अलिबागमध्ये आयोजित कार्यक्रमात दिली.
अलिबाग येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘चला शाळेत जाऊ या’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील शाळांची प्रगती साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासकीय चौकटीपुरते मर्यादित न राहता लोकप्रतिनिधी, अधिकारी, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी शाळांना प्रत्यक्ष भेटी द्याव्यात. शाळांमधील अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
यावेळी पालकमंत्री भरत गोगावले आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार पंडीत पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, महिला बाल कल्याण सभापती रसिका केणी, जिल्हाधिकारी किशन जावळे उपस्थित होते.
