रत्नागिरी : संभाव्य दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाणीटंचाई व जनावरांसाठी चारा टंचाई निर्माण होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करावे, असे निर्देश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख मा. दत्ताजी कदम यांनी राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर आणि चिपळूण येथील सर्व तालुकाप्रमुखांना दिले आहेत.

या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यात गावनिहाय पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, विहिरी, तलाव, बंधारे व अन्य नैसर्गिक जलस्रोतांची सद्यस्थिती तपासून संभाव्य टंचाईग्रस्त भाग निश्चित करावेत. जलसंधारण, पावसाचे पाणी अडविणे व जिरविणे, जलस्रोतांचे संवर्धन तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करावी. त्याचबरोबर जनावरांसाठी उपलब्ध चारा व संभाव्य चारा टंचाईचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

केवळ नियोजनापुरते मर्यादित न राहता शिवसैनिक, स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवकांच्या सहभागातून शक्य असलेल्या जलसंधारणाच्या कामांसाठी श्रमदान करावे. आवश्यकतेनुसार ग्रामपंचायती व संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजनांचा पाठपुरावा करावा. सर्व तालुकाप्रमुखांनी केलेल्या पाहणीचा, संभाव्य अडचणींचा, प्रस्तावित उपाययोजनांचा आणि प्रशासनाकडून अपेक्षित मदतीचा सविस्तर गावनिहाय अहवाल जिल्हाप्रमुखांकडे तातडीने सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ ही शिकवण केंद्रस्थानी ठेवून, त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात जनतेच्या पाणीप्रश्नासाठी, शेतकरी बांधवांच्या हितासाठी आणि पशुधनाच्या संरक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीतून योगदान देणे, हे त्यांच्या विचारांना अभिवादन ठरेल. संभाव्य संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहणे आणि संकट येण्यापूर्वीच सज्ज राहून उपाययोजना करणे, हीच शिवसेनेची सामाजिक बांधिलकी असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले आहे.