मुंबई : कालपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या अशी मागणी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यापासून संजय राऊत यांच्यापर्यंत सगळे करत होते. आता देशभरात बॅलेट पेपरवर झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत 28 जागा लढणाऱ्या काँग्रेसला फक्त एका जागेवर यश मिळाले. ज्या एका ठिकाणी यश मिळाले तेथेही दुसऱ्या पसंतीवर मिळाले. याचा अर्थ स्पष्ट आहे की, निवडणूक बॅलेटवर घ्या किंवा ईव्हीएम मशीनवर, जनतेचा काँग्रेसवर विश्वास नाही, असा प्रहार भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशभरात काँग्रेसचा दारुण पराभव करण्याचे काम देशातील जनतेने केले. काँग्रेसची अवस्था दारूण झाली असल्याने किमान आता तरी राहुल गांधींनी बॅलेट पेपर, बॅलेट पेपर अशी बोंब न मारता जनतेत जावे आणि जनतेचा कौल स्वीकारावा. ईव्हीएम असो किंवा बॅलेट पेपर, दोन्ही ठिकाणी इंडिया आघाडीचे बारा वाजलेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातील एनडीए पुन्हा एकदा सक्षम असल्याचे श्री. बन यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात महायुतीत, थोडासा समन्वय असला असता तर पुण्याची जागाही भाजपाने जिंकली असती आणि छत्रपती संभाजीनगरची जागाही राष्ट्रवादीला मिळाली असती. पुण्यामध्ये शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मंगेश चिवटे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यांना देण्यात आलेला एबी फॉर्म मागे घेतल्यानंतर महायुती म्हणून आम्ही एकत्रित निवडणूक लढवू, अशी अपेक्षा असताना ऐनवेळेला शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला. सचिन सानप यांना जवळपास 16 हजार मते मिळाली आणि पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या स्मिता जाधव साधारणतः 11 ते 12 हजार मतांनी पराभूत झाल्याचे विश्लेषण श्री. बन यांनी केले.
शिक्षक मतदारसंघातील शिक्षक मतदार पदवीधर मतदारसंघातही पदवीधर म्हणून मतदान करत असतात. सचिन सानप यांना मिळालेली ती 15 ते 16 हजार मते पदवीधर मतदारसंघात भाजपाला मिळाली असती तर स्मिताताई जाधव पहिल्या फेरीत विजयी झाल्या असत्या. परंतु दुर्दैवाने मित्रपक्षाकडून एका जागेच्या हव्यासापोटी, तीही त्यांची अधिकृत जागा नसताना आणि अधिकृत उमेदवार दिलेला नसताना, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने पुण्यात महायुतीच्या दोन जागांपैकी एका जागेवर पराभवाला सामोरे जावे लागले. छत्रपती संभाजीनगरात सुनेत्राताई पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने सतीश चव्हाण यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती. तेथे सतीश चव्हाण यांच्याविरोधात अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे भूमिका घेतली आणि तिथेही मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने विरोधात काम केले, असा आरोप श्री. बन यांनी केला.
महायुतीविरोधात काम करणाऱ्या धंगेकरांवर कारवाई करा
पुण्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे महानगरप्रमुख रविंद्र धंगेकर यांनी अधिकृतपणे भाजपा उमेदवाराला मत देऊ नका, असे जाहीर आवाहन केले. पुण्यात शिक्षक मतदारसंघासाठी तुम्ही पाठिंबा दिला, तिथपर्यंत आम्ही समजू शकतो. परंतु पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार नसताना रविंद्र धंगेकर निवडणुकीनंतर पुन्हा पोस्ट करतात की, “शाब्बास पदवीधरांनो!” याचा अर्थ काय? भाजपाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात शिवसेनेचा एखादा पदाधिकारी अशी भूमिका घेणार असेल तर हे अतिशय गंभीर आहे. महायुती म्हणून आम्ही अमरावतीत एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेला पूर्ण मदत केली. तिथे आमच्या काही लोकांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्याचे काम माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी केले. रविंद्र धंगेकर यांनी केसाने गळा कापण्याचा निर्णय घेतला असेल, तर अशा झारीतल्या शुक्राचार्यांविरोधात एकनाथजी शिंदे यांनी कारवाई करावयास हवी, अशी मागणी श्री. बन यांनी केली.
