मुंबई : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात येणारा दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही माहिती देत दिवाळीच्या काळात नागरिकांनी रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीला आवर घालावा, असे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी शिवाजी पार्क मैदानावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या दीपोत्सवासाठी आकर्षक रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते. मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नागरिक या दीपोत्सवाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन हा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र सध्या अत्यंत विचित्र परिस्थितीतून जात असून, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील नागरिक, महिला आणि त्यांच्या मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एका बाजूला ग्रामीण भागातील नागरिक दुष्काळामुळे होरपळत असताना दुसऱ्या बाजूला मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करणे मनाला पटत नसल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी यंदाचा दुष्काळ ७२ वर्षांपेक्षाही अधिक भयानक असेल, असे म्हटले होते. मात्र, राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेत्यांना या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले नसावे, अशी टीका करत त्यांनी गरबा खेळण्यात व्यस्त असलेल्या नेत्यांचाही उल्लेख केला.
दुष्काळामुळे ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक शहरांकडे स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दिवाळीचा उत्साह साजरा करताना प्रत्येकाने आपल्या आनंदाला काही प्रमाणात मर्यादा घालणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
नागरिकांनी दिवाळी साजरी करू नये, असे आपले म्हणणे नसल्याचे स्पष्ट करत राज ठाकरे यांनी कंदील लावावेत, फराळ वाटावा आणि परंपरेनुसार दिवाळी साजरी करावी; मात्र मोठ्या प्रमाणावर रोषणाई करणे आणि फटाके फोडणे टाळावे, अशी विनंती केली. महाराष्ट्रातील नागरिकांनी दुष्काळग्रस्त बांधवांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून यंदाची दिवाळी साजरी करावी, असेही ते म्हणाले.
पुढील वर्षी परिस्थिती सुधारेल आणि पुन्हा एकदा मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करता येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना मनसे, आपल्या कुटुंबाच्या आणि स्वतःच्या वतीने दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
