चिपळूण : केवळ शेतीमालाचे उत्पादन घेण्यापुरते मर्यादित न राहता त्यावर प्रक्रिया करून स्वतःचा उद्योग उभारण्याच्या दृष्टीने शेतकरी बांधवांनी पुढाकार घ्यावा. शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल. यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा शेतकरी, तरुण, महिला बचत गट आणि नवउद्योजकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्या तथा माजी सभापती सौ. पूजा शेखर निकम यांनी केले.
सावर्डे येथील केदारनाथ हॉलमध्ये प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत शेतकरी व नवउद्योजकांसाठी विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला सौ. पूजा निकम उपस्थित होत्या.
यावेळी योजनेचे अन्नप्रक्रिया मास्टर ट्रेनर लीलेश निकम यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. अन्नप्रक्रिया उद्योगातील विविध व्यवसाय संधी, उद्योग उभारणीची प्रक्रिया, शासनाकडून मिळणारे अनुदान, प्रकल्प अहवाल तयार करणे, उत्पादनांचे ब्रँडिंग, पॅकेजिंग तसेच बाजारपेठ उपलब्ध करून घेण्याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक कर्जप्रक्रिया आणि ऑनलाइन अर्ज करताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहितीही देण्यात आली. शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीच्या खरेदीवर या योजनेअंतर्गत अनुदान मिळू शकते, असे सांगण्यात आले. यामध्ये पिठाची गिरणी, मसाला ग्राइंडिंग मशीन, राईस मिल, डाळ मिल, ज्यूस एक्स्ट्रॅक्टर, पल्पर मशीन, ड्रायर, सॉस व जॅम निर्मिती यंत्रे, तेल काढण्याचे ऑइल एक्स्ट्रॅक्शन मशीन, दूध पाश्चरायझेशन युनिट, खवा निर्मिती व पॅकेजिंग मशीन तसेच ओव्हन, मिक्सर आणि स्लायसर यांसारख्या बेकरी उद्योगासाठी उपयुक्त यंत्रांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे यापूर्वी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे अन्नप्रक्रिया उद्योग सुरू केलेल्या स्थानिक लाभार्थ्यांनी आपले अनुभव आणि यशोगाथा उपस्थितांसमोर मांडल्या. बँक कर्ज आणि शासकीय अनुदानाच्या माध्यमातून उद्योग उभारणी कशी केली, त्यातून आर्थिक उन्नती कशी साधता आली, याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या अनुभवांमुळे उपस्थित शेतकरी व नवउद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.
या कार्यक्रमाला मंडळ कृषी अधिकारी सावर्डे मनोज गांधी, कृषी पर्यवेक्षक ए. वाय. जाधव, कृषी सहाय्यक श्रीमती पाळके, उपकृषी अधिकारी विकास पिसाळ, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) पंकज कोरडे, सहाय्यक कृषी अधिकारी विजय सांकुर्डे, कृषी सहाय्यक आकाश चव्हाण, रविंद्र जगताप आदी उपस्थित होते.
