मुंबई दि.६ नोव्हेंबर – सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून त्यांच्या महान कार्याचा आणि पुरोगामी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग राज्यभरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

अल्पसंख्याक समुदायातील महिला, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांपर्यंत महात्मा फुले यांचे विचार प्रभावीपणे पोहोचवणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
​
अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुला-मुलींच्या सर्व शासकीय वसतिगृहांमध्ये अनेकविध उपक्रम राबवले जाणार आहेत. या वसतिगृहांमध्ये “महात्मा फुले ग्रंथ कोपरा” स्थापन करण्यात येणार असून, यामध्ये महात्मा फुले यांचे साहित्य मराठी, उर्दू आणि हिंदी या तीन भाषांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाईल. राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये “सत्यशोधक विचार” या संकल्पनेवर आधारित निबंध व वक्तृत्व स्पर्धा सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. महात्मा फुले यांच्या जीवनकार्याची आणि विचारांची माहिती देणाऱ्या विशेष रील्स आणि व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या जाणार आहेत. या क्लिप्स विभागाचे अधिकृत संकेतस्थळ तसेच विविध समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून डिजिटल माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवल्या जातील. डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेअंतर्गत समाविष्ट मदरशांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, गणित आणि वाचन स्पर्धांचा समावेश असलेला “महात्मा फुले शैक्षणिक सप्ताह” आयोजित केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीमार्फत महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘गुलामगिरी’ आणि ‘शेतकऱ्याचा आसूड’ या अत्यंत महत्त्वाच्या व निवडक ग्रंथांचा उर्दू भाषेत अनुवाद करून त्यांचे प्रकाशन केले जाईल,अशी माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

​महात्मा फुले यांच्या समतावादी आणि शैक्षणिक क्रांतीच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत, विशेषतः अल्पसंख्याक घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सर्व उपक्रम अत्यंत मोलाचे ठरतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.