मुंबई : मुंबईतील प्रभादेवी परिसरातील संत रोहिदास रहिवासी संघाच्या चाळीवर आज बुलडोझर कारवाई करण्यात येत आहे. १९७५ पासून या चाळीत रहिवासी वास्तव्यास असून, जवळपास तीन पिढ्यांचं वास्तव्य या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या काळात म्हणजेच सुमारे पंधरा दिवसांपूर्वी रहिवाशांना चाळ खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती. १९ नोव्हेंबरपर्यंत जागा खाली करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

मात्र, या कारवाईविरोधात प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून, २५ नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचं रहिवाशांचं म्हणणं आहे. असं असतानाच आज अचानक पोलीस बंदोबस्तात बुलडोझर आणून तोडक कारवाई सुरू करण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रभादेवी परिसरात वास्तव्यास असलेल्या रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. आमच्या तीन पिढ्या याच चाळीत वाढल्या असून, अचानक कारवाई सुरू करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. त्यामुळे या कारवाईविरोधात रहिवाशांमध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे.