मुंबई: अलिबाग येथील किहीम गावात संजय राऊत यांच्या कुटुंबीयांच्या नावावर झालेल्या दहा जमीन व्यवहारांचे सातबारे, गट क्रमांक आदी तपशील पत्रकार परिषदेत सादर करत भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांची मंगळवारी संजय राऊत यांची पोलखोल केली. एका वृत्तवाहिनीनेही या गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधत जमीन व्यवहारांमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड केले होते. त्यामुळे राऊत यांनी या प्रकरणावर स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी मंगळवारी दिले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राऊत यांचे राहुल नार्वेकरांवरील आरोप राजकीय आकसातून असल्याचे सांगत श्री. बन म्हणाले राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून शिवसेनेतील पक्षफुटीच्या प्रकरणात कायदेशीर तरतुदी आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे विधिमंडळातील अधिकृत पक्ष कोणता आणि शिवसेनेचा मूळ पक्ष कोणाचा, याबाबत योग्य निर्णय दिल्यानंतर संजय राऊत आणि उबाठा गटाकडून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. राऊत यांच्या मनात राहुल नार्वेकर यांच्याबद्दल राग आणि आकस निर्माण झाल्याने त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने अडचणीत आणण्याचा आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काल आणि आज करण्यात आलेले आरोपही त्याच राजकीय द्वेषातून आणि असूयेतून करण्यात आले आहेत, असा आरोप श्री. बन यांनी केला.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवर टीका करणाऱ्या सतेज पाटील यांना कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या निर्णयांची आठवण करून देत श्री. बन यांनी दोन्ही राज्यांतील मदतीची तुलना केली. सतेज पाटील यांचा कोल्हापूर मतदारसंघ कर्नाटकजवळ असल्याने त्यांनी कर्नाटकातील शेतकऱ्यांची परिस्थिती आणि तेथील सरकारने दिलेली मदत याचीही माहिती घ्यावी. महाराष्ट्रात देवाभाऊंच्या सरकारने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये दिले. त्याचबरोबर शेतकऱ्यांना कर्जमाफीचाही निर्णय घेतला. दुसरीकडे, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असताना तेथील शेतकऱ्यांना केवळ अडीच हजार रुपये अंतिम मदत देण्यात आली. सतेज पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातील शेतकऱ्यांनाही पाच हजार रुपयांची मदत आणि कर्जमाफी देण्याची मागणी करावी, असे आव्हान श्री. बन यांनी दिले.
सतेज पाटलांनी अभिषेक मनु सिंघवींना दिली 80 लाख फी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या न्यायालयीन प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीसाठी सतेज पाटील यांनी ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना तब्बल 80 लाख रुपये फी दिली तर त्यांना दिल्लीहून छत्रपती संभाजीनगरला आणण्यासाठी विशेष चार्टर विमानाची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी एक कोटी रुपये खर्च कुठल्या खात्यातून करण्यात आला, असा सवाल करत श्री. बन यांनी याचा हिशेब महाराष्ट्रातील जनतेला देण्याचे आव्हान दिले.
हा खर्च सतेज पाटील यांनी स्वतः केला की गोकुळच्या निधीतून करण्यात आला की अन्य कोणत्या खात्यातून त्याची तरतूद झाली, याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे, अशी मागणी करत श्री. बन यांनी या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वकिलांना दिल्या जाणाऱ्या फी बाबत स्पष्टीकरण दिले. शासनाच्या पॅनेलवरील वकिलांना शासनाच्या नियमांनुसार आणि निर्धारित निकषांनुसार फी दिली जाते. एखादे प्रकरण गोकुळचे आहे म्हणून अधिक फी दिली जाते किंवा अन्य प्रकरण आहे म्हणून कमी फी दिली जाते, असे नसते. मात्र गोकुळसारख्या महत्त्वाच्या सहकारी संस्थेशी संबंधित न्यायालयीन प्रकरणात मोठ्या प्रमाणावर खर्च झाल्याने या खर्चाच्या आर्थिक स्रोताबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे, असा मुद्दा बन यांनी उपस्थित केला. वकिली फी आणि चार्टर विमानाच्या प्रवासासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करण्याऐवजी हा पैसा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरता आला असता, असा टोलाही श्री. बन यांनी लगावला.
