पुणे – राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी चौंडी येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन विकासकामांना चालना देण्यात आली होती. त्याच धर्तीवर राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथेही १२ जानेवारी २०२७ रोजी विशेष मंत्रिमंडळ बैठक घेऊन अजितदादांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न पूर्ण करावे, अशी मागणी करतानाच बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून ‘जिजाऊनगर’ करण्यात यावे, असा ठराव राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात महिला प्रदेशाध्यक्षा वैशालीताई नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे जिल्हा (ग्रामीण) महिला पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक आणि विकासात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी तीन महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
लोकनेते अजितदादा पवार यांच्या नावापुढे ‘स्वर्गीय’ हा शब्द न लावता भाषणे, बॅनर आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये केवळ ‘लोकनेते अजितदादा पवार’ असाच उल्लेख करण्यात यावा, असा दुसरा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, सहकारी साखर कारखाने, बँका, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ तसेच अन्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व महिला प्रतिनिधींना पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून अनिवार्यपणे आमंत्रित करण्यात यावे, असा तिसरा ठराव मंजूर करण्यात आला.
दरम्यान, सिंदखेडराजा येथे विशेष मंत्रिमंडळ बैठक घेण्याची आणि बुलढाणा जिल्ह्याला ‘जिजाऊनगर’ नाव देण्याची मागणी करणाऱ्या ठरावाची प्रत महिला प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला पदाधिकाऱ्यांच्यावतीने उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजितदादा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात येणार आहे.
या बैठकीत उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी लोकनेते अजितदादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी पाहिलेल्या स्वप्नातील महाराष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प केला. यावेळी ‘अजितदादांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवूया, एकजुटीने काम करूया!’ अशा घोषणा देत महिला पदाधिकाऱ्यांनी आपला निर्धार व्यक्त केला.