लांजा: जमीन जागेच्या वादातून शेजारी शेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये भांडण होऊन एकमेकांना मारहाण शिवीगाळ केल्याची घटना शिपोशी जाधववाडी येथे बुधवारी २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली असून यामध्ये तिघेजण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दाखल झालेल्या परस्परविरोधी तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत धोंडू जाधव (वय ५५, रा.शिपोशी जाधववाडी, लांजा ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास राहते घरासमोर आपला मुलगा श्रवण हा कामाला जात नसल्याने त्याला राग मनात धरून पत्नी व मुलगा यांना शिवीगाळ करत होते. तसेच संजय शंकर डाफळे याने वडिलांकडून जमीन फसवून घेतली असे बोलत असताना त्याचा राग मनात येऊन संजय डाफळे याने श्रीकांत जाधव यांना तू भाई झाला आहेस का, असे बोलून त्यांना शिवीगाळ केली व दमदाटी करून आपल्या हातातील काठीने त्यांच्या डोक्यावर पाठीवर मारले. तसेच पत्नी श्रावणी ही भांडण सोडवण्यासाठी गेली असता तिचे हाताला पायाला काठी लागून लहान दुखापती केली. या घटनेत दोघे पती-पत्नी जखमी झाले.
या मारहाण प्रकरणी श्रीकांत जाधव यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी संजय डाफळे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १३१ प्रमाणे तसेच भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तर या घटनेप्रकरणी संजय शंकर डाफळे (वय ५२, रा.शिपोशी जाधववाडी, ता.लांजा) यांनी केलेल्या फिर्यादीनुसार श्रीकांत धोंडू जाधव हा २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन संजय डाफळे यांना शिवीगाळी व ठार मारण्याची धमकी देत होता. याबाबत विचारणा केली असता तसेच आपल्या मालकीची गुरे गोठ्यात बांधून घरी जात असताना श्रीकांत जाधव याने संजय डाफळे यांच्या पाठीमागून डोक्यात कोयती मारून दुखापती केल्या. यामध्ये ते जखमी झाले.
या घटनेप्रकरणी संजय डाफळे यांनी केलेल्या तक्रारीनुसार लांजा पोलिसांनी श्रीकांत जाधव यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १३१ प्रमाणे तसेच भादवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करत आहेत.