रत्नागिरी:या वर्षी एल निनो व पाऊस अनियमित व कमी सरासरीत पडल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण होऊन अनेक गावातून पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे याची गांभीर्यता लक्षात घेऊन तसेच कोकणात नाम फाउंडेशन संस्थेने नाम जलसाठा अभियान सुरू करुन गावा गावात लोकसहभागाची मोठी चळवळ उभी केली आहे .

खरे पाहता दर वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक गावात जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार ग्रामस्थ लोकसहभागातून पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेतून गावच्या नदीवर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यापासून दगड माती प्लास्टिक चा उपयोग करून बंधारे बांधत असतात ज्यामुळे नदीमधून संथ वाहणारे पाणी अडवून जमिनीत जिरवले जाते आणि साठलेल्या पाण्याचा उपयोग शेती, वन्य प्राणी तसेच अन्य वापरासाठी केला जातो. परंतु पावसात हे बंधारे न काढले गेलेने सदरहू नाले पऱ्हे गाळाने भरतात. या वर्षी नाम फाउंडेशनचे कोकण समन्वयक प्रथमेश पोमेंडकर व शाहनवाज शाह हे नाम चे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी आलेल्या गावच्या नदी पात्रात सर्वेक्षण करून जो जुना गाळ नाल्या पर्ह्यात जमा आहे तो गाळ काढून विजय बंधारे बांधून जलसाठे तयार केले जात आहेत. यामुळे गावच्या नदी पात्रातील वाहून जाणारे पाणी जवळपास लाखो लिटर पर्यंत साठवले जात आहे.
3 नोव्हेंबर 2026 पासून रत्नागिरी जिल्ह्यात नाम जल साठा अभियानाला सुरुवात झाली. यामध्ये खेड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीतील चोरवणे , पोसरे खुर्द, धामणंद, निवे, आंबडस, चिरणी गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे, हेदवी चिपळूण तालुक्यातील कान्हे , आकले, मांडकी व शहरातील शीव नदी तसेच संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी आंत्रवली (मालप वाडी) हेदली काम २० पूर्ण झाले असून सध्या नायरी ते कसबे या भागात दोन जे सि बि सलग काम करीत आहेत. आतापर्यंत या अभियानातून सरासरी ७० मीटर लांब, १ मीटर खोली आणि 20 मीटर रुंद असा गाळ काढून त्या गाळाने २० विजय बंधारे बांधण्यात आले म्हणजे जवळपास नाम जलसाठा अभियानातून 2 कोटी लीटर पाणी साठविण्यात आले आहे. नाम फाउंडेशन रत्नागिरी जिल्ह्यात चे सतत दोन जे सि बी कार्यरत असून या अभियानाला विविध गावातील ग्रामस्थांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.ग्रामस्थ डिझेल ची व्यवस्था तसेच श्रमदान करून भविष्यातील दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत

या पुढे ज्या ज्या गावातून गाळ नाले पऱ्हे मधून गाळ काढून विजय बंधारे बांधायचे आहेत त्यांनी प्रथमेश पोमेडकर ९५६१३२९२६० शाहनवाज शाह ९८२२८२०३९५ यांचे कडे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे