चिपळूण : येथील सुप्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ व स्प्रिंग स्किन अँड कॉस्मेटोलॉजी लेझर क्लिनिकचे संचालक डॉ. यतीन जाधव आणि डॉ. वैशाली जाधव यांना नुकताच प्रतिष्ठेचा एबीपी माझा आरोग्यरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या उल्लेखनीय वैद्यकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करण्यासाठी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि विभा अरविंद ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. खेंड येथील विभा अरविंद ग्रंथालयाच्या कार्यालयात हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक श्री. प्रकाशकाका देशपांडे यांच्या हस्ते डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब काणे म्हणाले की, आपल्या डॉक्टर साहेबांचे कर्तृत्व एवढे मोठे आहे की, त्यांना मिळालेल्या आरोग्यरत्न पुरस्काराचाच खऱ्या अर्थाने सन्मान झाला आहे, असे अभिमानाने म्हणावे लागेल. आई-वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची शिदोरी आणि त्यातून घेतलेली प्रेरणा यांच्या बळावर डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव हे वैद्यकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यातही सातत्याने योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतात.”
यानंतर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनी आपल्या मनोगतात जाधव दाम्पत्याच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, शुद्ध बीजापोटी रसाळ गोमटी, या उक्तीप्रमाणे या दाम्पत्याचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य आहे. उत्तम संस्कार, सेवाभाव आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुंदर संगम त्यांच्या कार्यातून दिसून येतो.”
या कौतुक सोहळ्याला विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. बापूसाहेब काणे, बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राष्ट्रपाल सावंत, लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष श्री. धनंजय चितळे, कोषाध्यक्ष श्री. सुबोध दीक्षित, श्री. राम दांडेकर, श्री. अभिजीत देशमाने, सौ. मानसी पटवर्धन, श्री. विनायक ओक, सौ. मनीषा दामले, सौ. रेखा देशपांडे , विभा अरविंद ग्रंथालयाच्या संचालिका सौ. मेधा बेटकर, सौ. सोमण, श्री. सुहास चव्हाण, विभा अरविंद ग्रंथालयाच्या सल्लागार सौ. गौरी भोसले, कार्यवाह श्री. विजय कदम,पत्रकार श्री. राजेश जोष्टे, श्री. प्रदीप पवार, ॲक्सिस बँकेचे अधिकारी श्री. अमित रहाटे आणि श्री. विवेक शिंदे, सी ए सुमेध करमरकर, श्री संजय पोकळे, श्री सीताराम पडते, सौ मेहंदी बेबल, सौ श्रिया खानविलकर, श्री अशोक जाधव, श्री अविनाश पाणकर, श्री राजेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय क्षेत्रात रुग्णसेवा बजावत असतानाच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. जाधव दाम्पत्याचा या सोहळ्याद्वारे करण्यात आलेला गौरव उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. चिपळूणमधील विविध वाचनालयांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित या कौतुक सोहळ्यामुळे डॉ. यतीन जाधव व डॉ. वैशाली जाधव यांच्या कार्याला कौतुकाची नवी पावती मिळाली आहे .