श्रीवर्धन : राज्यातील विविध भागांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन, महाराष्ट्र यांच्यातर्फे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहायता निधीस ₹३,३३,३३३ (अक्षरी रुपये तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस फक्त) इतकी आर्थिक मदत देण्यात आली.

महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी श्री. निलेश पवार, पुणे युनिटचे जनरल सेक्रेटरी श्री. प्रमोद शिंदे तसेच नागपूर व विदर्भ युनिटचे जनरल सेक्रेटरी श्री. महेंद्र धोंडसे यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला.

दुष्काळामुळे शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींची जाणीव ठेवून असोसिएशनने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा मदतीचा उपक्रम राबविला आहे. या माध्यमातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत व पुनर्वसन कार्यास हातभार लावण्याचा असोसिएशनचा प्रयत्न आहे.

बँकिंग संस्था आणि त्यामधील अधिकारी-कर्मचारी यांची जबाबदारी केवळ व्यावसायिक कर्तव्यांपुरती मर्यादित नसून समाजाप्रतीही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असले पाहिजे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित झाला आहे. संकटाच्या काळात समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याची असोसिएशनची सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.