मुंबई : आयआयटी बॉम्बे येथील विद्यार्थी साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (CBI) किंवा विशेष तपास पथकामार्फत (SIT) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. तसेच, या प्रकरणाचा तपास निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. “ही व्यवस्था देशाच्या बुद्धिमत्तेचा गळा घोटत आहे,” अशा शब्दांत त्यांनी या प्रकरणातील व्यवस्थात्मक त्रुटींवर प्रश्न उपस्थित केले.
परीक्षेदरम्यान कॉपी केल्याचा आरोप झाल्यानंतर काही तासांतच साहिल वाकोडे याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात साहिलच्या पालकांच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात बाजू मांडली. विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्यात यावे आणि हे फुटेज प्रसारमाध्यमांपर्यंत कसे पोहोचले, याचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे.
ॲड. आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा वाढता प्रश्नही न्यायालयासमोर मांडला. ही घटना केवळ हिमनगाचे टोक असल्याचे सांगत त्यांनी संसदेत सादर करण्यात आलेल्या आकडेवारीचा संदर्भ दिला. गेल्या दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या १२२ घटना नोंदवण्यात आल्या असून, यावर्षी ही संख्या आणखी जास्त असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
संस्थेच्या नियमानुसार, परीक्षेदरम्यान कॉपी केल्याचे आढळल्यास विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका जप्त करून त्याला नवीन उत्तरपत्रिका देणे आणि उर्वरित परीक्षा देण्याची संधी देणे अपेक्षित असते. मात्र, साहिलला परीक्षा हॉलमधून बाहेर काढून विभागप्रमुखांच्या कार्यालयात नेण्यात आले आणि तेथे सुमारे तीन तास ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. त्या कालावधीत नेमके काय घडले, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयात मांडले.
या प्रकरणात प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला आणि संस्थेच्या इतर अधिकाऱ्यांविरोधात पवई पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या मुंबई गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
दरम्यान, साहिल वाकोडे यांच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय किंवा एसआयटीमार्फत चौकशी, निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास आणि सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याची मागणी केल्याची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ‘X’ या सोशल मीडिया खात्यावरून पोस्टद्वारे दिली आहे.
