मुंबई: मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविंद्र कुलकर्णी यांनी पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘संविधान संकल्पनांचा विकास : पश्चिमी आणि भारतीय’ या पुस्तकाचे कौतुक केले. भारतीय संविधानातील विविध संकल्पना, त्यांचा ऐतिहासिक विकास आणि संवैधानिक तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा या पुस्तकातून महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
पुस्तकात न्याय, सामाजिक समानता, बंधुता, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मित केलेले भारतीय संविधान समजून घेणे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे. याच उद्देशाने मुंबई विद्यापीठाने कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी यांसह सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणाच्या अंतर्गत भारतीय संविधान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.