मुंबई : देवाभाऊंचे सरकार भ्रष्टाचाराबद्दल शून्य सहानुभूती दाखवणारे आहे. कुणाचाही भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. जनाब संजय राऊत, पत्राचाळ घोटाळ्यात तुम्ही हजारो कोटी रुपये लुटले, मराठी माणसाला बेघर केले, आधी त्याचा हिशोब द्या. शंभर कोटी वसुलीच्या प्रकरणांमध्ये महाराष्ट्राची इज्जत घालवण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले होते. उद्धव ठाकरे हे भ्रष्टाचाराचे शिरोमणी होते. एखाद्यावर आरोप करत असताना त्याचे काही पुरावे असतील तर दिले पाहिजेत. विनाकारण हवेत गोळीबार करणे हा संजय राऊतांचा जुना धंदा आहे, असा प्रहार भाजपा मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कुठल्याही भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाहीत. उलट महाविकास आघाडीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्याचे काम उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झाले होते. संजय राऊत, तुम्हाला तर भ्रष्टाचारासाठी ऑर्थर रोड तुरुंगात राहावे लागले. आणि भरोशाच्या म्हशीला रेडकू काय असते, हे महाविकास आघाडीचे सरकार असताना जनतेने पाहिले. म्हणूनच मतदारांनी उद्धव ठाकरेंना घरामध्ये बसवले आणि देवेंद्र फडणवीस यांना तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले. हा उद्धव ठाकरे आणि देवाभाऊंमधला फरक आहे, हे संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे, असे श्री. बन यांनी सुनावले.
संजय राऊत यांना अलिबागमध्ये पत्रकार परिषद घ्यायची असेल तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे जे 19 बंगले अलिबागमध्ये आहेत त्याठिकाणी एक जाहीर पत्रकार परिषद घेतली पाहिजे. ते 19 बंगले नेमके कसे बांधले गेले, 19 बंगले कसे तोडले गेले, त्यांची घरपट्टी कशी भरली गेली, हा इतिहास महाराष्ट्राला ठाऊक आहे. संजय राऊत, तुम्हीही जवळपास आठ ते दहा सातबारे हे शेतकऱ्यांना धमकावून, बळजबरीने तुमच्या कुटुंबीयांच्या नावावर केलेत. त्यामुळे हिंमत असेल तर त्या शेतकऱ्यांसोबत जाऊन अलिबागमध्ये त्या 19 बंगल्यांसमोर एक पत्रकार परिषद घेऊन दाखवा, असे आव्हान श्री. बन यांनी दिले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कुणाचीही फसवणूक केली नसल्याचे सांगून श्री. बन पुढे म्हणाले, खरे तर आदिवासी बांधवांनीच राहुलजी नार्वेकर यांच्याबद्दल व्हिडिओ करून त्यांनी आमची कुठेही फसवणूक केली नाही, असे स्पष्ट केले आहे. राहुल नार्वेकर यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये राग आहे, कारण विधानसभेत खरी शिवसेना कुणाची याबद्दल त्यांनी निकाल दिला. त्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक संजय राऊत यांच्याकडून धादांत खोटे आरोप केले जात आहेत.