मुंबई :‘पुस्तक महोत्सव हा एक अनोखा उपक्रम आहे. येथे विद्यार्थ्यांची मोठी संख्या पाहून मला अतिशय आनंद झाला आहे. येथे पुस्तकांचा मोठा खजिना उपलब्ध आहे. मुले, विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिकाने या पुस्तकांमधून ज्ञान घेऊन राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे,’ असे प्रतिपादन देशातील अग्रगण्य उद्योगपती गौतम अदानी यांनी केले.

नॅशनल बुक ट्रस्ट, इंडिया यांच्या वतीने आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत होते.

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, मुख्य आयोजक अमित साटम, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी, प्रायोजक एस्पेक्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित कांबोज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुनील देशपांडे, संजीव जायसवाल आणि महेंद्र कल्याण हे व्यासपीठावर उपस्थित होते.

ट्रस्टचे संचालक युवराज मलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना सांगितले की, मुंबईकरांमध्ये वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे हा ‘मुंबई पुस्तक महोत्सवा’चा प्रमुख उद्देश आहे.

‘पत्रकारिता : जनतेचा आवाज’ या विषयावर आयोजित विशेष सत्रात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांच्याशी मीडिया व्यावसायिक देवता पाटील यांनी संवाद साधला.

यावेळी प्रेम शुक्ल म्हणाले की, गेल्या दीड दशकात पत्रकारिता अधिक प्रभावशाली आणि व्यापक झाली आहे. तिच्या विविध आयामांचा विस्तार झाला असून, काळानुसार ती समाजासाठी अधिक बोधप्रद बनली आहे. भारतीय तसेच जागतिक स्तरावरील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रभाव टाकण्यातही पत्रकारितेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

बॉक्स

२९ नोव्हेंबरपर्यंत चालणार मुंबई पुस्तक महोत्सव

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परिसरात सहा दिवसीय पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, हा महोत्सव २९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या महोत्सवात २०० प्रकाशक सहभागी झाले असून, ६०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या महोत्सवात नामवंत लेखकही सहभागी झाले आहेत.

यासोबतच संकल्पनांवर आधारित प्रदर्शने आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम हे महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना साहित्याच्या विविध विश्वाशी जोडण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात प्रवेश पूर्णपणे विनामूल्य ठेवण्यात आला आहे.