- राजकीय कारकीर्द –
नगराध्यक्ष लातूर – 1 ऑगस्ट 1966 ते 31 मार्च 1970
आमदार लातूर – 1972 ते 1980
विधानसभा उपाध्यक्ष – 5 जुलै 1977 ते 2 मार्च 1978
विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र – 17 मार्च 1978 ते 6 डिसेंबर 1979
लोकसभा सदस्य, लातूर – 1980 ते 2004
केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री – 1980 ते 1982
केंद्रीय वाणिज्य मंत्री – 1982 ते 1983
केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री – 1983 ते 1984
लोकसभा उपसभापती – 19 मार्च 1990 ते 13 मार्च 1991
लोकसभा सभापती – 10 जुलै 1991 ते 22 मे 1996
केंद्रीय गृहमंत्री – 22 मे 2004 ते 30 नोव्हेंबर 2008
राज्यसभा सदस्य – 5 जुलै 2004 ते 22 जानेवारी 2010
पंजाब राज्यपाल – 22 जानेवारी 2010 ते 21 जानेवारी 2015
🔸 निष्कलंक नगराध्यक्ष ते राज्यपाल, केंद्रीय मंत्री, लोकसभाध्यक्ष असा केला राजकीय प्रवास
लातूर : – गेली सहा दशके लातूरच्या राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेले व देशाच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तिमत्त्व लातूरचे नगराध्यक्ष ते राज्यपाल असा राजकीय प्रवास करणारे जेष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन आज दि. 12 डिसेंबर रोजी झाले आहे.
चाकूरकर यांच्या परिवारातील विवाह सोहळ्यासाठी शिवराज पाटील चाकूरकर हे खास दिल्लीवरून लातूरला आले होते.मात्र लातूरला आल्यानंतर अचानक अशक्तपणा आल्याने चाकूरकर यांची प्रकृती खालावली.चाकूरकर यांच्यावर त्यांचे फॅमिली डॉक्टर चाकूरकर यांच्या देवघर या निवासस्थानीच उपचार करत होते. डॉक्टरांची टीम देखील सोबत होती. 5 डिसेंबर पासून शिवराज पाटील चाकूरकर यांची प्रकृती आणखीनच खालावली होती,अगदी अन्नपाणी देखील घ्यायला चाकूरकर यांनी नकार दिला होता.अश्या परिस्थितीत अगदी एअर रुग्णवाहिकेने शिवराज पाटील चाकूरकर यांना दिल्लीला हलवण्याची देखील चाचपणी करत अगदी तयारी देखील केली होती. चाकूरकर यांचे मानसपुत्र बसवराज पाटील यांनी आवश्यक यंत्रणा देखील आणायची तयारी केली होती. मात्र स्थानिक डॉक्टरांनी अश्या परिस्थितीमध्ये शिफ्ट करणे योग्य नाही असा सल्ला दिल्याने चाकूरकरांना हलवण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.व अखेर आज त्यांची प्राणज्योत मावळली असून लातूरच्या राजकारणातील निष्कलंक व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. लातूरचे नगराध्यक्ष ते पंजाबचे राज्यपाल अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली.गांधी परिवाराचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख.सोबतच 60 वर्षाच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप नाही,राजकीय डाग नाही,भ्रष्टाचाराचे आरोप नाही,शुद्ध चरित्र हे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य राहिले.त्यामुळे 6 दशकांचा निष्कलंक राजकीय प्रवास थांबला असे म्हणावे लागेल.त्यांच्या पश्चात मुलगा शैलेश पाटील,सून अर्चना पाटील व दोन नाती असा परिवार आहे.पंजाबचे राज्यपाल या पदावरून पायउतार झाल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर हे राजकारणात सक्रिय नव्हते.लातूरचे नगराध्यक्ष, आमदार ते खासदार असा 1967 पासून 2004 पर्यंत राजकीय प्रवास करत असताना त्यांनी कधीही पराभव पाहिला नाही.मात्र 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला,व त्यांनी कधीही निवडणुकीत सहभाग घेतला नाही.लातूर लोकसभा मतदारसंघ हा 2009 ला राखीव झाल्याने चाकूरकर हे शेजारच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील असे कायम बोलले गेले,मात्र 2004 नंतर चाकूरकर यांनी कोणतीही निवडणूक लढली नाही.60 वर्ष लातूर,मुंबई पासून दिल्लीपर्यंत राजकारण करत असताना आपल्या नेतृत्वाला चाकूरकरांनी कधी जातीय रंग येऊ दिला नाही.किंवा एका ठराविक जातीचे नेतृत्व म्हणून चाकूरकरांना कधी शिक्का बसला नाही.लिंगायत समाजातून चाकूरकर येत असले तरी त्यांनी स्वतःला मर्यादीत कधीही करून घेतले नाही,किंवा तसा संदेश जाईल अशी कृती देखील आपल्या हातून होऊ दिली नाही.सर्वपक्षीय संबंध असलेले चाकूरकर यांना ते ज्या लातूरमधून नेतृत्व करायचे त्याच लातुरातील मुस्लिम समाज खूप मानायचा.त्यांचे एक वेगळे व आदराचे स्थान समाजात होते,अगदी शेवटपर्यंत राहिले.असलेला प्रचंड अभ्यास, मराठी,इंग्रजी, हिंदी भाषेवर असलेले प्रभुत्व व प्रभावी मांडणी हे चाकूरकर यांच्या राजकीय प्रवासाचे विशेष गुण राहिले.त्यांच्या निधनाने एक अभ्यासू,सर्वधर्म समभाव मानणाऱ्या व त्यांची अंमलबजावणी आपल्या कृतीतून करणाऱ्या नेतृत्वाची पोकळी चाकूरकर यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे असे नक्कीच म्हणता येईल.
राजकीय टीका व पाठीमागे विरोध करणे चाकूरकरांना जमलेच नाही.
राजकारणात कुरघोडी करणे,एकमेकांचे पाय ओढणे ,पाठ फिरली की विरोधात बोलणे असे प्रकार कांही नवीन नाहीत.हे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे.मात्र नगराध्यक्ष ते राज्यपाल पदापर्यंतचा राजकीय प्रवास पार करत असताना कधी कोणाविषयी राजकीय टीका आपल्या भाषणातून सोडा,खाजगीमध्ये देखील शिवराज पाटील चाकूरकर यांनी केली नाही.1991 ला नगर परिषद निवडणुकीत चाकूरकरांना वीरोध म्हणून विलासराव देशमुख यांनी काँग्रेसच्या विरोधात स्वतः मंत्री असताना उमेदवार देत राजीव मंच या नावाखाली निवडणूक लढली.काँग्रेसचे उमेदवार पाडले.आणि एस आर देशमुख यांना नगराध्यक्ष केले,त्याच एस आर देशमुख यांना पुढे करून आजच्या राजीव गांधी चौक येथे बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्याचे निश्चित झालेले असताना रातोरात एस आर देशमुख यांनी त्याठिकाणी राजीव गांधी यांचा पुतळा आणून बसवला आणि मोठा गोंधळ लातुरात झाला.मात्र यात शिवराज पाटील चाकूरकर यांना लिंगायत समाजात बदनाम करण्याचा आणि त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत चाकूरकरांना फटका बसावा असा हेतू होता.पुढे 2004 ला तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांनी मिळून रूपाताई पाटील निलंगेकर यांना चाकूरकर यांच्या समोर उभा करून पराभव केला हे जगजाहीर होते.अगदी लातूर शहरातील बाबासाहेब आंबेडकर पार्कवर झालेल्या कार्यक्रमात शिवराज पाटील चाकूरकर व्यासपीठावर असताना भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी मी आणि विलासराव देशमुख यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांना कसे लोकसभा निवडणुकीत पाडले याची जाहीर कबुली दिली होती.त्याला प्रतिउत्तर म्हणून चाकूरक यांनी एक शब्द आपल्या भाषणात काढला नाही.किंवा नंतर देखील त्या निवडणुकीचा कोठे उल्लेख देखील चाकूरकरांनी केला नाही.बाकी कोणाच्या विरोधात बोलणे, किंवा लूज टॉक न करणे,अगदी आपल्या विरोधकांविषयी देखील अपशब्द न काढणे हे देखील शिवराज पाटील चाकूरकर यांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य राहिले. राजकारणात मतांसाठी, प्रसिध्दीसाठी एखादे काम केले नसेल तर ते आपल्यामुळे झाले हे सांगण्याची केविलवाणी धडपड सर्वश्रुत आहे.मात्र न केलेले तर सोडा केलेल्या कामाची देखील प्रसिद्धी किंवा श्रेयवादाचा प्रकार शिवराज पाटील चाकूरकरांनी केला नाही हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य आहे असे अधोरेखित करावे लागेल.लातूर – मुंबई रेल्वेसाठी आवश्यक प्रक्रिया ही चाकूरकरांनी केली याची कधीही वाच्यता चाकूरकरांनी केली नाही.आज जे सहकाराचे जाळे लातूर जिल्ह्यात मांजरा परिवाराने उभे केले,ज्याची सुरुवात मांजरा सहकारी साखर कारखान्यापासून सुरुवात झाली त्या मांजरा साखर कारखान्याची परवानगी ही शिवराज पाटील चाकूरकर यांच्यामुळे मिळाली हे बहुतांश लोकांना माहिती नाही.असे अनेक निर्णय चाकूरकरांनी नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असताना केले.पण हे काम मी केले,हे माझ्यामुळे झाले असे श्रेय घेण्याचे किंवा प्रकाशझोतात राहणे यापासून शिवराज पाटील चाकूरकर हे दोन हात लांब राहिले. यापुढे जाऊन चकूरकरांनी केलेल्या कामाचे श्रेय इतर कोणी घेतले तरी चाकूरकर शब्द देखील काढत नव्हते.असे राजकीय नेतृत्व नक्कीच विरळ असते जे नेतृत्व चाकूरकरांनी केले.
