अमेरिकेत लँडिंगदरम्यान एक प्रायव्हेट जेट कोसळल्याची गंभीर घटना घडली आहे. मध्य मेक्सिकोमध्ये आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न करत असताना हे विमान कोसळले असून या भीषण अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात मेक्सिको सिटीपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर आणि टोलुका विमानतळापासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सॅन माटेओ अटेंको येथील औद्योगिक भागात झाला. संबंधित प्रायव्हेट जेटने मेक्सिकोच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील अकापुल्को येथून उड्डाण घेतले होते.
विमानात एकूण ८ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स होते. तांत्रिक बिघाडामुळे पायलटने फुटबॉल मैदानावर आपत्कालीन लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र विमान जवळील कारखान्याच्या छतावर आदळून कोसळले.
अपघातानंतर विमानाला मोठी आग लागली आणि संपूर्ण विमान जळून खाक झाले. परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले होते. या दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील सुमारे १३० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून या अपघाताची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
