नागोठणे (महेश पवार) : ठाणे महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मधून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या आणि कोपरी पाच पाखडी विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना उपशहर प्रमुख असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका नम्रता भोसले – जाधव यांनी नागोठण्यातील त्यांचे कौंटुबिक स्नेही व राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय नेते भाई टके यांच्या निवासस्थानी रविवारी (दि.८) सकाळी सदिच्छा भेट दिली.

यावेळी भाई टके कुटुंबियांकडून त्यांचे कौटुंबिक स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान नगरसेविका नम्रता भोसले यांनी भाई टके व दीपाली टके यांच्या तब्येतीची आपुलकीने विचारपूस केली आणि त्यांनी भाई टके व त्यांच्या पत्नी दीपाली दिलीप टके यांचे आशीर्वाद घेतले.

या प्रसंगी नम्रता भोसले – जाधव व भाई टके यांच्यात राजकीय तसेच कौटुंबिक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. परिसरातील सामाजिक, राजकीय घडामोडी तसेच स्थानिक प्रश्नांवरही दोघांमध्ये मनमोकळ्या गप्पा रंगल्या. या भेटीत आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते. नम्रता भोसले – जाधव यांनी ठाणे मिरा भाईंदर महानगरपालिका वृक्ष व प्राधिकरण सदस्या म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. भाई टके कुटुंबियांची भेट घेतल्या नंतर नम्रता भोसले – जाधव ह्या त्यांच्या गुहागर या मुळ गावी रवाना झाल्या.
भाई टके हे नागोठणे परिसरातील एक ज्येष्ठ व लोकप्रिय राजकीय नेते म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांना भेटण्यासाठी अनेक मान्यवर नेहमी त्यांच्या निवासस्थानी येत असतात.
दरम्यान, नम्रता भोसले यांनी भाई टके यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचे कौतुक करत त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर भेट सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्याचे उपस्थितांकडून सांगण्यात आले.