लांजा ( गोविंद चव्हाण ) : लांजा तालुक्यात वीजबिलांच्या थकबाकीचा आकडा तब्बल ८३ लाख ६७ हजार रुपयांवर पोहोचला असून ही रक्कम वसूल करण्यासाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यात एकूण ३७ हजार ७७८ वीज ग्राहक असून विविध प्रकारच्या ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
लांजा तालुक्यात लांजा १, लांजा २, भांबेड आणि साटवली अशी एकूण चार शाखा कार्यालये असून त्या अंतर्गत घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक, शासकीय, पाणीपुरवठा तसेच पथदिवे अशा विविध प्रकारच्या ग्राहकांकडून ही थकबाकी जमा झाली आहे. यामध्ये घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व शासकीय ग्राहकांची मिळून ३९ लाख ४ हजार रुपये, पाणीपुरवठा ग्राहकांची ३६ लाख ८२ हजार रुपये आणि पथदिव्यांची ७ लाख ८१ हजार रुपये अशी एकूण ८३ लाख ६७ हजार रुपयांची थकबाकी आहे.
तालुक्यातील थकबाकीचा तपशील पाहिला असता, घरगुती ३३ हजार १८३ ग्राहकांपैकी ३ हजार ८३६ ग्राहकांकडे २२ लाख ४७ हजार रुपये, औद्योगिक ३७८ ग्राहकांपैकी ५२ ग्राहकांकडे ६ लाख ३३ हजार रुपये, तर व्यावसायिक १ हजार ८४७ ग्राहकांपैकी २५३ ग्राहकांकडे ४ लाख ७२ हजार रुपये इतकी थकबाकी आहे. याशिवाय शासकीय ४५३ ग्राहकांपैकी १४४ ग्राहकांकडे ५ लाख ५२ हजार रुपये थकीत आहेत. तसेच पाणीपुरवठा विभागाच्या २९५ ग्राहकांपैकी ११७ ग्राहकांकडे तब्बल ३६ लाख ८२ हजार रुपये तर पथदिव्यांच्या ११४ पैकी ३९ ग्राहकांकडे ७ लाख ८१ हजार रुपये इतकी थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
तालुक्यातील थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून लांजा शाखा कार्यालय २ आणि साटवली येथे वसुलीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र लांजा शाखा कार्यालय क्रमांक १ आणि भांबेड येथे वसुलीचा प्रतिसाद तुलनेने कमी असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वीजबिल भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सुमारे ६० टक्के बिलांचा भरणा ऑनलाईन होत असल्याचे समजले.
तर महावितरणने मार्च अखेर १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी तालुक्यातील सर्व शाखांमध्ये बैठका घेण्यात आल्या. या बैठका कोकण परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डांगे, रत्नागिरी मंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील कुमार माने आणि रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. तर या बैठकीस लांजा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता निलेश कुलकर्णी आणि कनिष्ठ अभियंता सचिन पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, लांजा तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून उपविभाग लांजा कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता संतोष चव्हाण यांच्याकडून करण्यात आले आहे.
▶सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
🎤सागर Wave न्यूज 🎤👇🏻
🪀 व्हाट्सअप ग्रुप जॉईन लिंक 🪀 👇🏻
