खालापूर : श्री समर्थ सांप्रदायाच्यावतीने खालापूर, पनवेल तालुक्यातील श्री सेवा दास्यभक्ती श्री समर्थ बैठकीच्यावतीने खारपाडा येथील डोंगराल भागात असणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जिते आरटीओ हद्दीत शेकडो विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

या वृक्षांचे जतन,संवर्धन व्हावे यासाठी समर्थ‌ सांप्रदायाच्यावतीने कोन श्री समर्थ बैठकीच्या अंतर्गत येणाऱ्या मोहोपाडा श्री समर्थ बैठक,आपटा श्री समर्थ बैठक,चांभार्ली श्री समर्थ बैठक,भाताण श्री समर्थ बैठक,तुराडे श्री समर्थ बैठक व आसपासच्या श्री समर्थ बैठकीच्यावतीने दासभक्तांनी हातात फावडे, कुदळ,कोयता, विला,पान्याचे ड्रम घेवून शेकडो सदस्यांनी लागवड केलेल्या झाडांभोवती वाढलेले गवत काढणे व परिसरात स्वच्छता अभियान राबविताना पहावयास मिळाले.यावेळी जांभूळ,पेरु,वड,आंबा,बदाम,उंबर,शिसव,कडुलिंब, चिंच,कांचन, पिंपळ, आशी, करंज, भेंड, गुलमोहर,काजू,कुडा ,सिताफळ,सप्तकर्णी,जाफल, हिरडा, सावर आदी जातीच्या वृक्षांभोवतालची स्वच्छता करण्यात आली आहे.
या वृक्षांचे संवर्धन करण्यासाठी खालापूर ,पनवेल तालुक्यातील श्री सदस्य हजर होते.कोणी वृक्षाभोवती आल्या करत,कोणी गवत कापत ,शेणखत टाकत तर कोणी पाणी आणून वृक्षांच्या बुंध्यावर टाकत,तर कोणी वृक्षाला आधार देण्यासाठी कुंपण करत असे दृष्य पहावयास मिळाले.