चिपळूण (ललेश कदम) : शहरातील नक्षत्र फॉमग ज्वेलरी येथे खाजगी बिल बुक तयार करून तसेच स्वतःचा क्यूआर कोड वापरून ग्राहकांकडून पैसे स्वतःच्या खात्यात जमा करून तब्बल 13 लाख 16 हजार 587 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरातील व्यापारी व ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सन 2022 ते 18 नोव्हेंबर 2025 या कालावधीत चिपळूण येथील नक्षत्र फॉमग ज्वेलरी या दुकानात हा प्रकार घडला. या प्रकरणी महेंद्र मधुकर शिंदे (वय 33 वर्षे, व्यवसाय हेड मॅनेजर, रा. पात्रे कॉम्प्लेक्स, हेड पोस्ट ऑफिस समोर, रत्नागिरी) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, या प्रकरणातील सुमित संजय शिंदे (रा. कोंढे, शिंदेवाडी, ता. चिपळूण) याने स्वतःचे खाजगी बिल बुक तयार करून घेतले. त्या बिल बुकवर सिमयंती गणेश तांबीटकर हिच्या सह्या घेण्यात आल्या. त्यानंतर सुमित शिंदे नक्षत्र फॉमग ज्वेलरीच्या चिपळूण शाखेतील दागिन्यांचा माल ग्राहकांना या खाजगी बिल बुकद्वारे विक्री केला.
माल विक्री करताना काही ग्राहकांकडून रोख स्वरूपात रक्कम घेतली तर काही ग्राहकांना स्वतः तयार केलेला खाजगी क्यूआर कोड स्कॅन करण्यास सांगितले. ग्राहकांनी क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित रक्कम थेट आरोपीच्या वैयक्तिक खात्यात जमा होत होती. अशा प्रकारे दुकानाच्या अधिकृत खात्यात न भरता आरोपीने परस्पर स्वतःच्या ताब्यात पैसे घेतले.
या प्रकारातून एकूण 13,16,587 रुपये अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दिनांक 9 मार्च 2026 रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात सुमित संजय शिंदे व सिमयंती गणेश तांबीटकर या दोघांवरही गुन्हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.