गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी नागपूरमधील अन्न पुरवठा विभागाने छापेमारी सुरू केली आहे. गॅस एजन्सी आणि गोडाऊनवर अन्न आणि वितरण विभागाकडून छापेमारी करण्यात येत आहे. .
गॅस पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभुमीवर नागपूरात अधिकार्यांच्या पथकाची धाडसी कारवाई समोर येत आहे. गॅस सिलिंडरचा अवैध साठा तपासण्यासाठी नागपूर अन्न पुरवठा विभागाकडून छापेमारी सुरू आहे. मध्य पुर्वेत युद्धामुळे नागपूरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवत असल्याने काळाबाजार करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल होणार असल्याचा इशारा पुरवठा विभागाचे परिमंडळ अधिकारी विनोद वाघदे आणि सागर बावरे यांनी दिला. गॅसचा पुरेसा साठा, नागरिकांना मोठे आवाहन.
राज्यात गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई तर केली जात नाही ना, याची खबरदारी सरकार घेत आहे. गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवत असल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आता सरकारने कडक पावलं टाकली आहेत.
गॅस सिलिंडरचा अवैध साठा आणि ब्लॅक मार्केटिंग केलं तर थेट गुन्हा दाखल होणार आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त डॅा. विपीन ईटनकर यांनी साठेबाजांना हा इशारा दिला आहे. नागपूर पोलीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयांचे भरारी पथकं धाडसत्र राबवणार आहे. सध्या नागपूरात गॅस सिलिंडरचा कुठलाही तुटवडा नाही, अशी माहिती त्यांनी दिली. काही लोक भितीने गॅस सिलिंडरचा साठा करुन ठेवत आहेत. आम्ही पोलीस विभाग, अन्न वितरण विभागाची बैठक घेतली आहे. वेगवेगळ्या टीम नागपूर जिल्ह्यात धाडसत्र सुरु करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तालुकास्तरीय भरारी पथकाची नजर
अमेरिका आणि इराण मध्ये सध्या युद्ध परिस्थिती सुरू आहे.याच पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग प्रशासन देखील अलर्ट मोडवर आलेले आहे. घरगुती एलपीजी गॅसचा अवैध वापर आणि गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात तालुकास्तरीय भरारी दक्षता पथक स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सध्या जागतिक परिस्थितीचा विचार करता इंधनाबाबत तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीमध्ये गॅस इंधनाचे दर वाढण्याची, घरगुती गॅसचा अवैध वापर, काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यामध्ये पथक तैनात केले आहेत.या पथकांमार्फत घरगुती गॅसचे सुरक्षित वितरण होत आहे का याची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच गॅसचा अवैध वापर, काळाबाजार रोखणे, गॅस वाहतूक गाडी अडविणे आणि प्राप्त तक्रारींची चौकशी करणे अशी जबाबदारी या पथकावर सोपविण्यात आली आहे.
