पोलादपूर (शैलेश पालकर)- पंचायत समिती पोलादपूरच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार कपिल घोरपडे आणि गटविकास अधिकारी दीप्ती गाट यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले असता पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे अविनाश शिंदे आणि उपसभापतीपदी अनिता अनिल भिलारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.


पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पोलादपूर तालुक्यामध्ये शिवसेनेचे तीन व शेका पक्षाच्या एक पंचायत समिती सदस्या निवडून आल्या. पंचायत समितीचे सभापती पद हे सर्वसाधारण जाहीर झाल्याने पहिल्या अडीच वर्षासाठी या आरक्षणानुसार कोतवाल बुद्रुक पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य अविनाश शिंदे यांचा एकमात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. लोहारे पंचायत समिती गणाच्या नवनिर्वाचित सदस्य अनिता अनिल भिलारे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज उपसभापती पदासाठी करण्यात आला. दोन्ही उमेदवार जिल्हा परिषदेच्या लोहारे गटामधील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य असल्याने या निवडणुकीवर कोणत्या नेत्याचे वर्चस्व हे स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पंचायत समिती पोलादपूरच्या प्रांगणामध्ये झालेल्या सभेमध्ये माजी राजिप सभापती व मंत्री पत्नी सुषमाताई गोगावले, मंत्री कन्या कोमल मोरे, माजी राजिप उपाध्यक्ष तथा लोहारे जि प गटाचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रकांत कळंबे, बळीराम फौजदार, तालुका संपर्कप्रमुख किशोर जाधव, तालुका प्रमुख निलेश अहिरे, महिला संघटक सुवर्णा कदम, शहर प्रमुख सुरेश पवार, शांताराम गोळे, दशरथ उतेकर, माजी उपसभापती मीनाताई साळुंखे व शकुंतला महाडिक, अस्मिता पवार, पंचायत समितीचे सदस्य अनिल दळवी आणि हर्षदा कांबळेकर तसेच शिवसेना व शेका पक्षाचे एकनाथ गायकवाड आणि बापू जाधव आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी किशोर जाधव, निलेश आहिरे, चंद्रकांत कळंबे तसेच अन्य मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती अविनाश शिंदे आणि उपसभापती अनिता भिलारे यांच्या अभिनंदनाच्या भाषणात, गेल्या 14 वर्षापासून पंचायत समितीच्या दालनामध्ये शिवसेना सदस्यांना सन्मानाने प्रवेश नव्हता. मात्र आता पोलादपूरच्या जनतेने शिवसेना व शेका पक्षाच्या युतीच्या चारही सदस्यांना विजयी करून सेवेची संधी दिली आहे, अशी भावना व्यक्त केली.
यानंतर बॅरिस्टर नाथ पै सभागृहामध्ये माजी राजिप उपाध्यक्ष व तालुक्याचे नेते चंद्रकांत कळंबे आणि मंत्री पत्नी सुषमाताई गोगावले यांनी सभापती अविनाश शिंदे आणि उपसभापती अनिता भिलारे यांचे काल व पुष्पहार अर्पण करून अभिनंदन केले.